सुरूवातीचे दिवस आणि 'आंबेडकरी' वाटचाल



('बहिष्कृत गोमंतक' पुस्तकातील लेखक दादू मांद्रेकर यांच्या मनोगतातील निवडक भाग)

आंबेडकरवाद नावाच्या वादळाने वैचारिक थैमान जे माझ्या मनात पंचवीस - तीस वर्षांचा असतानापासून घातले त्यातूनच अनेक उर्मी माझ्या डोक्यात जाग्या झाल्या. काम करण्याची प्रचंड शक्ती, उत्साह माझ्यात निर्मार झाला. प्रत्येक वस्तू, व्यक्तीकडे पाहण्याचा साक्षेपी दृष्टिकोन जागा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उठता-बसता लोककल्याणाच्या किंवा सृजनशीलतेच्या अनेक कल्पना, संकल्पना डोक्यामध्ये घर करून राहण्याची, जमले तर त्या प्रत्यक्षात कोणाच्यातरी साहाय्याने उतरवण्याची एक सवय लागून राहिली. बाष्फळ बडबड किंवा अनाठायी कोणाच्यावर टिका-टिपणी करत बसण्यापेक्षा मी कोर आहे व मला माझ्या ताकदीप्रमाणे इतरांना मदत करता येते का याचा पडताळाही घेण्याची सवय सतत लागून राहिली.

हे सांगण्याचे  कारण म्हणजे दहावी-अकरावीत असताना आयु. सुभाष नायक सरांनी जो पाठीवर प्रेमाचा हात पहिल्यांदा फिरवून माझ्या अस्तित्वाची व अस्मितेची जी मला जाणीव प्रथम करून दिली त्याच्यातूनच मी विचार करू शकलो. त्या घटनेपासूनच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय कीर लिखित चरित्राची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर व्ही.पी.पी. हे प्रकरण काय आहे हे माहीत नसतानाही मागवले. ते पुस्तक व्ही.पी.पी.ने आल्यानंतर आईच्या सोन्याच्या कुड्या गहाण टाकून ते पुस्तक सोडवले. वाचले. जमेल तसे वाचून काढले.

या अवधीतच त्यावेळचे दै. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांनी एक प्रयोग चालवला होता. सर्जनशील युवक शोधण्याचा व गावागावातील समस्यांना वाच फोडण्याचा. ... त्यातूनच त्यांनी मला दै. गोमंतकच्या परिवारात सामील करून घेऊन ... शरद कारखानीस यांच्या स्वाधीन केले. त्यांनी माझ्यावर धाकट्या बंधूसारखे अलोट प्रेम करून समता काय असते हे समता आयुष्याला कधीच न अनुभवलेल्या एका लाजाळु, श्यामळु मागासवर्गीय ग्रामीण तरुणाला दाखवून दिले. अनेक मोठ्या व्यक्ती, ग्रंथ, संदर्भ यांचा परिचय चर्चेतून करून दिला. त्यातूनच मला माझी स्वत:ची एक दृष्टी लाभली.

शरद कारखानीस यांच्याकडून पत्रकार आणि पत्रकारिता यासंबंधी प्रशिक्षण मिळाल्यानंतर माझ्याकडे दै. गोमंतकची पेडणे तालुक्यातील जबाबदारी गडकरी यांनी सोपवली व शरद कारखानीस यांनी आधीच व्यापक बनवलेली माझी दृष्टी अधिक विशाल, विजिगीषू, प्रगाढ आणि शोधक बनली. निसर्ग, माणूस, वस्तू यांचे अवलोकन नव्हे तर अक्षरश: ती वाचली. पाहिली. हे मला माझ्या तालुक्यातीलल दै. गोमंतकचा प्रतिनिधी म्हणून काम करताना जाणवले.

... माधव गडकरी गोमंतक सोडून मुंबई सकाळचे स्थानिय संपादक म्हणून काम पाहण्यासाठी निघून गेले. ..शरद कारखानीसही मुंबईला जाण्याचा विचार करू लागले. त्यामुळे दै. गोमंतकमधून सरकारी नोकरीत जाण्याचा माझाही विचार पक्का झाला. 

...तोपर्यंत मी आधुनिक बांबू कारागिरीचा अभ्यासक्रम सी. डी.  वर्गीस यांच्याकडून पूर्ण केला होता. कोकणच्या रत्नागिरीपासून कर्नाटकातील कारवारपर्यंत पसरलेल्या महार जमातीचा व्यवसाय म्हणजे बांबू व्यवसाय. मी याच समाजात जन्मलेलो. माझे आई-वडीलही हाच व्यवसाय करायचे. मी त्यांचा एकुलता एक मुलगा. घरात जे आवश्यक होते ते सर्व काम मला येत असूनही आईचे श्रम हलके करण्यासाठी सर्व काही मी करीत असूनही त्यावेळी बांबूकाम हेतूपूर्वक शिकलो नाही. कारण ज्या व्यवसायाने आम्हाला तुच्छ लेखायला भाग पाडले ते मी कधीच हाती घेणार नाही असा निश्‍चय केला होता व तो बांबूकामाचे अत्याधुनिक स्वरूप पाहीपर्यंत पाळला. दै. गोमंतकच्या कामामुळे सतत पणजीचा संबंध येऊ लागला व तेथील हॉटेलातून भरणार्‍या प्रदर्शनात मी ज्यावेळी बांबू कारागिरीचे आधुनिक स्वरूप पाहिले त्यावेळी माझा यासंबंधीचा असलेला पूर्वग्रहदूषितपणा गेला व माझी नजर साफ झाली.

मी ते हस्तकारागिरीचे काम शिकलो व उद्योग खात्यात कारागीर म्हणून गोमंतक सोडून सरकारी नोकरीत शिरलो. 

************************



('बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्व आणि माहात्म्य' ग्रंथाच्या प्रस्तावनेतून )

डॉ. बाबासाहेबांच्याच  विचारधारेवरून चालण्याचा मी निर्णय अगदी मला वाटते पंधरा-सोळाव्या वर्षीच घेतला. तेव्हापासून मी माझा व्यक्ती विकास आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले देवा-धर्मापलीकडील सामाजिक परिवर्तन आाणि जीवन  याविषयीचा घेतला वसा मी सोडला नाही.

... बाबासाहेबांची जन्मशताब्दी आली तेव्हा मी पस्तीस वर्षांचा होतो. चळवळीची धुरा 15-16 वर्षापासूनच खांद्यावर घेतली होती. गोव्यात नुकतेच मूळ धरू लागलेल्या आंबडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासमोर  मी डॉ.  बाबासाहेबांनी दिलेला धम्म आम्ही स्वीकारून आमची हजारे (sic) वर्षांची सांस्कृतिक गुलामगिरी धिक्कारण्याची बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी ही एक संधी आहे असा विचार मी मांडला आणि त्याप्रमाणे 14 एप्रिल 1991 रोजी आम्ही मांडवी तीरावर एक भव्य शामियाना घालून दोन दिवसांची धम्म परिषद घेतली. त्रौलोक्य (sic) बौद्ध महासंघाचे धम्माचारी लोकमित्र ह्या मूळ इंग्लीश माणसाने आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबाना आम्ही अश्या अभिनव पद्धतीने त्यांच्या शंभराव्या वर्षी म्हणजे जन्मशताब्दी दिनी सामुदायिक पद्धतीने गोव्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानी नोंद केली जावी असे अभिवादन केले.

मी त्यापूर्वीच दहा वर्षे आधी एकट्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे धर्मानंद कोसंबीनंतर मी प्रत्यक्षात बौद्ध धम्माची दीक्षा घेणारा आणि तसे आचरण करणारा दुसरा गोमंतकीय आहे.

पूर्ण वेळ तहान-भूक विसरून लावलेल्या आंबेडकरवादी बोधीवृक्षाचे  लालन-पालन करताना मला कशाचीच तमा नव्हती. ह्या अवधीत माझ्याकडे असलेल्या सर्व कलागुणांचाच आणि प्रतिभेचाही मला विसर पडल्यासारखा झाला होता.

आंबेडकर चळवळीसाठी तन-मन-धनाने सर्व गोष्टी करताना मी माझे स्वत्वच विसरलो होतो. प्रसिद्धीच्या मागे कुठेच नसताना आणि ती घेणे माझ्या स्वत:च्याच हातात असताना मी त्यापासून कोसो दूर होतो. चळवळीत तरूण घडत होते, पण या प्रक्रियेपासून दुसर्‍या बाजूला मी माझ्य अप्रत्यक्ष द्वेषाचाच धनी ठरलो ! कुठलीच पदे न भुषवता, कुठल्याच व्यासपीठावर  न जाता मी कार्यकर्ता म्हणून चळवळीत झोकून दिले होते.

वर्तमानपत्रामधून अधून मधून आंबेडकर विचारधारेला गती देण्यासाठी लिहित होतो तेवढेच!

माझ्याभोवती पेटलेल्या ह्या द्वेष व मत्सराच्या आगीतून बाहेर पडायचे तर मला प्रत्यक्ष चळवळीतूनच बाहेर  पडणे आवश्यक होते. संपर्कातून बाहेर पडणे आवश्यक होते. मी आयुष्यभर कोणताच अपराध केलेला नसताना माझ्यावर अनेकवेळा अपमानजनक परिस्थिती आली. एका बैठकीत तर माझ्यामुळेच कार्यकर्ते दुरावत असल्याचा सूर लागला.

घरी आलो. दोन दिवस विचार केला आणि ज्या संस्था, संघटनेला मी जन्म दिला, तिला जोजवले, पालन-पोषण केले त्याच्या मूळ सभासदत्वाचा पूर्ण राजीनामा देवून मोकळा झालो.

काहीनी तर गोव्याबाहेर माझ्या साहित्यिक मित्राना माझ्यासंबंधी अतिशय चुकीची माहिती देऊन माझ्याविषयी माझ्या मित्रांची मते कलुषीत करण्याचा प्रयत्न केला. चळवळीतील कोणत्याच मित्रांचे मी कसलेच नुकसान केले नव्हते. उलट कोणतीच पदे न घेता प्रत्येकाला पुढे येण्यासाठीच मी धडपडत होतो. विषम व्यवस्थेविरूद्ध झुंजत होतो.  ह्या प्रसंगाने तर मी कोसळूनच पडलो. चार दिवस मी विषण्ण मनस्थितीत घालवले. आत्महत्येचाही एकक्षण मनात विचार येऊन गेला. माझी पत्नी अनिला हिनेच या गोष्टीतून मला प्रेमाची फुंकर घालून मला बाहेर काढले. त्या मुक्त अवस्थेतून नंतर अकादमीक स्तरावर खूपच मोठे काम झाले.

जे माझ्याच स्तरावर होती झ अशी नंतर अनेक कामे झाली. छायाचित्रणाचे खूप मोठे काम झाले. गोवा आणु (sic)(‘आणि’ असावे) गोव्याबाहेर एकंदर चार मोठी छायाचित्र प्रदर्शने झाली. संविधानावर प्रजासत्ताक नावाचे हिंदी, मराठी, कोंकणी आणि इंग्रजी भाषामधून राष्ट्रीय स्तरावर नियतकालिक निघू लागले.

पर्यावरणामध्ये काम करताना ‘पर्यावरण’ नावाचे अनियतकालिक निघू लागले. त्यापूर्वी सामाजिक, इतिहासाचेही परिशीलन करू लागलो होतो.

हे करत असताना संविधानाच्या सर्व अंगाचे यथार्थ दर्शन मला होते होते. त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधूभाव आणि न्याय ह्या मूलभूत तत्त्वांची सांगड मी भारतीय लोकजीनाशी घालू लागलो. त्याच बरोबर ह्या देशातील भौतीक आणि जैविक घटकाना डॉ. बाबासाहेबानी भारतीय संविधानाद्वारे पूर्ण संविधानात्मक अधिकारच प्रदान केल्याचे मला फार मोठे सत्य जाणवले आणि डॉ. बाबासाहेबांच्या भारतीय भौगोलिक सीमाक्षेत्रा  (sic) म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि त्यामधील असलेल्या सर्व जैविक, भौतिक घटकांचे सहअस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी त्याना संरक्षण देण्यासाठी त्यानी केलेला देशातील प्रत्येक अणूरेणूचा विचार माझ्या मनात सतत गुंजारव करू लागला.

आणखी माहिती…

(बाबासाहेब आंबेडकर :आंतरराष्ट्रीय महत्व आणि महात्म्य’ पुस्तकात लेखकाविषयी माहितीतून)

- निवृत्तीला 12 वर्षे शिल्लक असताना नोकरी सोडली
- 'शापित सूर्य', 'बहिष्कृत गोमंतक' ही दोन्ही पुस्तके गोवा विद्यापीठाच्या एम.ए. साठी पाठ्यपुस्तके म्हणून समाविष्ट