गोमंतकीय लेखक व चित्रकार गोविंद नाईक यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेले हे दादू मांद्रेकर यांचे कॅरिकेचर.

दादू मान्द्रेकर यांचे 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन

दादू मान्द्रेकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी अल्प आजारानंतर दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. 

त्यांच्या निधनाची वार्ता गोव्यातील टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या गोवाआवृत्तीत तसेच अन्य बहुतेक गोमंतकीय वृत्तपत्रांतून आलेली दिसते. यांत दै.लोकमत, दै. तरूण भारत, दै.गोमन्तक. दै.गोवनवार्ता, दै.दैनिक हेराल्ड, दै.भांगरभूंय यांचा समावेश होता. दै. नवप्रभा या वृत्तपत्राने दि 27 नोव्हेंबर 2020 रोजी एक संपूर्ण पान दादू मान्द्रेकर यांच्याकरिता वापरले आहे.

गोव्यातील एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीत दि. 27 नोव्हेंबर 2020च्या अंकातील बातमीत म्हटले आहे की ‘सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते,  लेखक, कवी, पत्रकार दादू मांद्रेकर (63) यांचे गुरूवारी संविधान दिनीच (बातमीतील संविधान दिनास अनुसरून उल्लेख दादू मान्द्रेकर यांच्या भारतीय संविधानातील मू÷ल्यांबद्दल त्यांच्या आग्रही मतांमुळे व त्यांच्या ‘प्रजासत्ताक’च्या संपादनामुळे असावा)निधन झाले. मांद्रेकर यांना कोविडची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. तथापि, पुन्हा आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे  लागले. ते मांद्रे येथे राहायचे. कालच त्यांच्या पार्थिवावर स्थानिक दफनभूमित बुद्धपरंपरा पाळून करण्यात आले.’(sic)

या बातमीच्या मथळ्यात ‘आंबेडकरवादी चळवळीचा शिलेदार हरपला’ असे म्हटले आहे.,

गोव्यातील अन्य एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीच्या 27 नोव्हेंबर 2020च्या अंकात म्हटले आहे की - ‘गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे अग्रणी दलितनेते दादू मांद्रेकर यांचे 26 रोजी म्हणजेच भारताच्या संविधान स्थापना दिनीच निधन झाले. ते आजीवन भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. संविधानातील समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष आदी मुल्यांची (sic) समाजात रूजवण व्हावी यासाठी अखेरपर्यंंत ते कार्यरत राहिले. आजारातून तेे बरे झाले होते, मात्र प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर त्यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. बुधवारी मांद्रे येथे स्थानिक दफनभूमीत बौद्ध धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट कवी, छायाचित्रकार आणि स्पष्टवक्ते म्हणून परिचित होते. ’ 

त्यांच्या निधनाबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातील, स्तरातील, धर्मांतील लोकांकडून दु:ख व्यक्त केल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यावरून दिसून येते. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनीही त्यांच्या निधनानंतर शोकसंदेश जारी केलेले दिसतात.

दरम्यान, तिबेतच्या भारतस्थित निर्वासित सरकारचे सभापती Pema Jungney यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यत केलेले दिसते. “I am saddened to learn the demise of Shri Dadu Mandrekar who was a staunch and ardent supporter of our cause. On behalf of the 16th Tibetan Parliament in Exile, I would like to pay my sincere condolences to you and your family.” ही बातमी येथे क्लिक करून पाहता येईल.

दरम्यान,  लोकमतने दादू मान्द्रेकर यांच्या निधनाच्या दुसर्‍या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी गोवा आवृत्तीच्या अंकात अग्रलेख लिहिलेला दिसतो. ‘एक झंझावात निमाला’ या शीर्षकाच्या या अग्रलेखात दादू यांच्या व्यक्तीमत्त्वाचे चित्रण करण्यात आल्याचे दिसते. अग्रलेखातील काही नोंदी अशा -

‘दादू मांद्रेकर यांच्या निधनाने गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात निर्माण झालेले न्यूनत्व बराच काळ राज्यातील संवेदनशील मनांना सलत  राहील. आपल्या पटलेल्या कारणासाठी जिवाचे रान करणारा तो हाडाचा कार्यकर्ता होता’

‘आंबेडकरांच्या प्रतिपादनाची चिकित्सा दादूने आपल्या विवेकाच्या सहाणीवर घासून केली. दलित उत्थानाची घाऊक कंत्राटे घेतलेल्या राजकारणपटूंच्या भोंदू अवसानाचे मर्मही त्याने समजून घेतले आणि मगच आंबेडकरी विचार श्रेष्ठ मानून त्याने या विचारांच्या प्रसारास वाहून घेतले. त्याच्या वैचारिक धारणांना प्रचंड वाचनाचे अधिष्ठान होते.’

उतरंडीच्या वरल्या स्तरावर असलेल्यांच्या अनुकंपेची आस बाळगण्यापेक्षा आपल्या मनगटातला जोर दाखवून संसाधनांच्या पुनर्वाटपाचा आग्रह धरण्याचे आंबेडकरी तत्त्वज्ञान त्याला भावले होते. त्यामुळे मतपेढीच्या राजकारणात त्याने कधीच स्वारस्य दाखवले नाही. तो त्या वाटेला फिरकलाच नाही. तो त्याचा पिंडही नव्हता. मंत्र्यांच्या दारात हुजरेगिरी करून नोकरी वा तत्सम लाभ पदरात पाडून घेण्याची सोय त्याने कधी शोधल्याचे आठवत नाही. उलट, जेव्हा त्याच्या आत्मसन्मानाला ललकारणारी परिस्थिती उद्भवली तेव्हा आपण शासकीय सेवाशर्तींच्या बंधनात असल्याचे नाकारण्याची हिंमत त्याने दाखवली.

पर्यावरणाविषयीची त्याची आस्था केवळ शब्दांच्या बुडबुड्यांपुरती मर्यादित नव्हती, तर त्याने तिला कार्यकुशलतेची जोडही दिली. पर्यावरणाच्या र्‍हासाविषयीची चिंता प्रकट करण्यासाठी आयोजिलेल्या प्रत्येक उपक्रमात तो हटकून उपस्थित राहायचा आणि बर्‍याच जणांच्या परीटघडीच्या धारणांना न पेलणारे सत्य सांगून जायचा.

दादू मान्द्रेकर आपल्या निवासस्थानी. (फोटो: विकिमिडीया)














चार पुस्तकांचे प्रकाशन


दादू मांद्रेकर यांचा 'शापित सूर्य 'च्या 
मलपृष्ठावरील फोटो. टिपणारे : डॉ. सुबोध केरकर. 
दादू मान्द्रेकर यांच्या चार पुस्तकांचे 29 एप्रिल 2017 रोजी प्रकाशन झाले. सुरूवातीच्या दोन पुस्तकानंतर 25 वर्षांनी ही चार पुस्तके आली आहेत. गोव्याची राजधानी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या मोठ्या सभागृहात सुमारे हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पुस्तके क्राऊड फंडिंगद्वारे काढण्यात आली आहे असेे म्हणता येईल. पुस्तकांच्या मागे 79 जणांची यादी असून त्यांनी आर्थिक मदत केल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारेे क्राऊड फंडिंगद्वारे पुस्तके प्रकाशित करणारे ते गोव्यातील एकमेव असावेत. एकूण मराठी साहित्याच्या क्षेत्रातही आधुनिक काळात अशाप्रकारे पुस्तके प्रकाशित व्हावीत हे नवीन असावे.


या कार्यक्रमात प्रकाशित चार पुस्तके अशी  :
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि महत्म्य (लेखसंग्रह)
2. भारतीय संविधान : आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि परिणाम (लेखसंग्रह)
3. ओंजळ लाव्हाची (कवितासंग्रह)
4. उंबरठा (पाच हजार वर्षांतील भारतीय स्त्रीत्वाचा आढावा घेणारी दीर्घकविता)

A Thorny Flower

Freedom Fighter and Ex. Editor of the daily 'Navpraba' Shri. Laxmidas Borker had written four article series on Dadu Mandrekar under title “A Thorny Flower” in the leading English daily of Goa “The Navhind Times” published from Panaji-Goa. These articles appeared from 15th February 1997 to 18th February 1997. This is a very brief excerpts from those articles.  
****************************

One storm called Dadu Mandrekar has taken Goa by storm by bringing waves of Ambedkar’s ideology to Goan shores for the first time.
…Dadu mandrekar along with four hundred Mahars embraced Budhist religion during two days Dalit conference held at panjim during Ambedkar birth centenary. He succeeded in fulfillment of the missions left unattained by Goan Buddhist monk Mantpunna and Goan Buddhist scholar Dharmanand Kosambi. Dadu launched a crusade against the injustice meted out to Dalits, especially Mahars in Goa.
……
Dadu Mandrekar’s introduction to the people as well as discovery of self to him was marked when his article published by the Gomantak, Marathi daily in their pernem taluka special issue attracted readers’ attention.
The sentence used by Dadu in his first-ever article was high-lighted by the-paper. It ran like this:

"During the course of development, roads will be constructed, developmental works will take place, improvement followed, but no perpetuity can be given that the civility will cross those roads,

……………….
Dadu Mandrekar is a prolific writer in prose as well as verse. He has written innumerable articles in different newspapers either signed or with nick names. But all his literature prose or verse comes under the dalit category.
He is more powerful in poetry than his prose literature. He firmly believes that only Ambedkarism is capable of taking the country towards total revolution and he has used poetry as a medium to reach to the bottom of hearts of his oppressed people.
'Shapit Surya' (cursed sun), his first book, a collection of potries, has created burning emotional waves. His fiery words might look crude-nude but are sharp and cut like a knife.
……
Dadu Mandrekar's poetry gives vision of tumultuous noise of one restless inner mind. It gives immense joy to see his poetry, painting social order's sorrows and that too syntaxing tumultuous noises in a peculiar style.
.....
The basic trait of Dadu Mandrekar's poetry is reformation and expectation of a change in confronting dreadful reality, false rites and the feeling of high high-low among the human beings.He has given vent to his feelings against gross social injustice. It is an outburst of a sensitive reformative poet.

दादू : काही निरीक्षणे

दादू मांद्रेकर यांची कविता गोव्यातील दलित कवितेचे उदाहरण म्हणून समोर येते. ‘शापित सूर्य’ हा त्यांचा कवितासंग्रह 1991 साली प्रकाशित झाला. गेल्या 19 वर्षांत मांद्रेकर यांनी आपले व्यक्तिमत्व टोकदारपणे घडवले आहे. पत्रकार, कवी, लेखक, विचारशील अभ्यासक, अभिनव छायाचित्रकार, अभिजात नर्तक, कृतिशील आंबेडकरवादी कार्यकर्ता  व प्रजासत्ताक या घटनाविषयक विचारकालिकाचे संपादक अशा अनेक अंगांनी त्यांनी स्वत:ला घडविले आहे.
आंबेडकरवादाचा प्रसार दादूने गोव्यात केला. 1998 मध्ये त्यांनी दोन दिवसांचे आंबेडकर विचार संमेलन भरविले. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. अरूण कांबळे, गंगाधर पानतावणे यांच्या परिवर्तनवादी विचारांनी गोव्यात नवचैतन्य निर्माण झाले. बौद्ध धम्माची दीक्षा दादूने घेतली. परन्तु गोव्यात आपण एकटे पडत असल्याची त्याची भावना आहे. कविता कुणाला वाचून दाखवायची आहे, असा प्रश्‍न दादू समोर पडणे साहजिक आहे. ‘शापित सूर्य’ या त्यांच्या संग्रहात सांस्कृतिक संघर्ष चित्रित झालेला दिसतो.
- नरेंद्र बोडके
(गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक, संपा. नरेंद्र बोडके, 2010, प्रका. नंदिनी तांबोळी, पुणे)

सुरूवातीचे दिवस आणि 'आंबेडकरी' वाटचाल



('बहिष्कृत गोमंतक' पुस्तकातील लेखक दादू मांद्रेकर यांच्या मनोगतातील निवडक भाग)

आंबेडकरवाद नावाच्या वादळाने वैचारिक थैमान जे माझ्या मनात पंचवीस - तीस वर्षांचा असतानापासून घातले त्यातूनच अनेक उर्मी माझ्या डोक्यात जाग्या झाल्या. काम करण्याची प्रचंड शक्ती, उत्साह माझ्यात निर्मार झाला. प्रत्येक वस्तू, व्यक्तीकडे पाहण्याचा साक्षेपी दृष्टिकोन जागा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उठता-बसता लोककल्याणाच्या किंवा सृजनशीलतेच्या अनेक कल्पना, संकल्पना डोक्यामध्ये घर करून राहण्याची, जमले तर त्या प्रत्यक्षात कोणाच्यातरी साहाय्याने उतरवण्याची एक सवय लागून राहिली. बाष्फळ बडबड किंवा अनाठायी कोणाच्यावर टिका-टिपणी करत बसण्यापेक्षा मी कोर आहे व मला माझ्या ताकदीप्रमाणे इतरांना मदत करता येते का याचा पडताळाही घेण्याची सवय सतत लागून राहिली.

हे सांगण्याचे  कारण म्हणजे दहावी-अकरावीत असताना आयु. सुभाष नायक सरांनी जो पाठीवर प्रेमाचा हात पहिल्यांदा फिरवून माझ्या अस्तित्वाची व अस्मितेची जी मला जाणीव प्रथम करून दिली त्याच्यातूनच मी विचार करू शकलो. त्या घटनेपासूनच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय कीर लिखित चरित्राची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर व्ही.पी.पी. हे प्रकरण काय आहे हे माहीत नसतानाही मागवले. ते पुस्तक व्ही.पी.पी.ने आल्यानंतर आईच्या सोन्याच्या कुड्या गहाण टाकून ते पुस्तक सोडवले. वाचले. जमेल तसे वाचून काढले.

या अवधीतच त्यावेळचे दै. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांनी एक प्रयोग चालवला होता. सर्जनशील युवक शोधण्याचा व गावागावातील समस्यांना वाच फोडण्याचा. ... त्यातूनच त्यांनी मला दै. गोमंतकच्या परिवारात सामील करून घेऊन ... शरद कारखानीस यांच्या स्वाधीन केले. त्यांनी माझ्यावर धाकट्या बंधूसारखे अलोट प्रेम करून समता काय असते हे समता आयुष्याला कधीच न अनुभवलेल्या एका लाजाळु, श्यामळु मागासवर्गीय ग्रामीण तरुणाला दाखवून दिले. अनेक मोठ्या व्यक्ती, ग्रंथ, संदर्भ यांचा परिचय चर्चेतून करून दिला. त्यातूनच मला माझी स्वत:ची एक दृष्टी लाभली.

शरद कारखानीस यांच्याकडून पत्रकार आणि पत्रकारिता यासंबंधी प्रशिक्षण मिळाल्यानंतर माझ्याकडे दै. गोमंतकची पेडणे तालुक्यातील जबाबदारी गडकरी यांनी सोपवली व शरद कारखानीस यांनी आधीच व्यापक बनवलेली माझी दृष्टी अधिक विशाल, विजिगीषू, प्रगाढ आणि शोधक बनली. निसर्ग, माणूस, वस्तू यांचे अवलोकन नव्हे तर अक्षरश: ती वाचली. पाहिली. हे मला माझ्या तालुक्यातीलल दै. गोमंतकचा प्रतिनिधी म्हणून काम करताना जाणवले.

... माधव गडकरी गोमंतक सोडून मुंबई सकाळचे स्थानिय संपादक म्हणून काम पाहण्यासाठी निघून गेले. ..शरद कारखानीसही मुंबईला जाण्याचा विचार करू लागले. त्यामुळे दै. गोमंतकमधून सरकारी नोकरीत जाण्याचा माझाही विचार पक्का झाला. 

...तोपर्यंत मी आधुनिक बांबू कारागिरीचा अभ्यासक्रम सी. डी.  वर्गीस यांच्याकडून पूर्ण केला होता. कोकणच्या रत्नागिरीपासून कर्नाटकातील कारवारपर्यंत पसरलेल्या महार जमातीचा व्यवसाय म्हणजे बांबू व्यवसाय. मी याच समाजात जन्मलेलो. माझे आई-वडीलही हाच व्यवसाय करायचे. मी त्यांचा एकुलता एक मुलगा. घरात जे आवश्यक होते ते सर्व काम मला येत असूनही आईचे श्रम हलके करण्यासाठी सर्व काही मी करीत असूनही त्यावेळी बांबूकाम हेतूपूर्वक शिकलो नाही. कारण ज्या व्यवसायाने आम्हाला तुच्छ लेखायला भाग पाडले ते मी कधीच हाती घेणार नाही असा निश्‍चय केला होता व तो बांबूकामाचे अत्याधुनिक स्वरूप पाहीपर्यंत पाळला. दै. गोमंतकच्या कामामुळे सतत पणजीचा संबंध येऊ लागला व तेथील हॉटेलातून भरणार्‍या प्रदर्शनात मी ज्यावेळी बांबू कारागिरीचे आधुनिक स्वरूप पाहिले त्यावेळी माझा यासंबंधीचा असलेला पूर्वग्रहदूषितपणा गेला व माझी नजर साफ झाली.

मी ते हस्तकारागिरीचे काम शिकलो व उद्योग खात्यात कारागीर म्हणून गोमंतक सोडून सरकारी नोकरीत शिरलो. 

************************



('बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्व आणि माहात्म्य' ग्रंथाच्या प्रस्तावनेतून )

डॉ. बाबासाहेबांच्याच  विचारधारेवरून चालण्याचा मी निर्णय अगदी मला वाटते पंधरा-सोळाव्या वर्षीच घेतला. तेव्हापासून मी माझा व्यक्ती विकास आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले देवा-धर्मापलीकडील सामाजिक परिवर्तन आाणि जीवन  याविषयीचा घेतला वसा मी सोडला नाही.

... बाबासाहेबांची जन्मशताब्दी आली तेव्हा मी पस्तीस वर्षांचा होतो. चळवळीची धुरा 15-16 वर्षापासूनच खांद्यावर घेतली होती. गोव्यात नुकतेच मूळ धरू लागलेल्या आंबडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासमोर  मी डॉ.  बाबासाहेबांनी दिलेला धम्म आम्ही स्वीकारून आमची हजारे (sic) वर्षांची सांस्कृतिक गुलामगिरी धिक्कारण्याची बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी ही एक संधी आहे असा विचार मी मांडला आणि त्याप्रमाणे 14 एप्रिल 1991 रोजी आम्ही मांडवी तीरावर एक भव्य शामियाना घालून दोन दिवसांची धम्म परिषद घेतली. त्रौलोक्य (sic) बौद्ध महासंघाचे धम्माचारी लोकमित्र ह्या मूळ इंग्लीश माणसाने आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबाना आम्ही अश्या अभिनव पद्धतीने त्यांच्या शंभराव्या वर्षी म्हणजे जन्मशताब्दी दिनी सामुदायिक पद्धतीने गोव्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानी नोंद केली जावी असे अभिवादन केले.

मी त्यापूर्वीच दहा वर्षे आधी एकट्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे धर्मानंद कोसंबीनंतर मी प्रत्यक्षात बौद्ध धम्माची दीक्षा घेणारा आणि तसे आचरण करणारा दुसरा गोमंतकीय आहे.

पूर्ण वेळ तहान-भूक विसरून लावलेल्या आंबेडकरवादी बोधीवृक्षाचे  लालन-पालन करताना मला कशाचीच तमा नव्हती. ह्या अवधीत माझ्याकडे असलेल्या सर्व कलागुणांचाच आणि प्रतिभेचाही मला विसर पडल्यासारखा झाला होता.

आंबेडकर चळवळीसाठी तन-मन-धनाने सर्व गोष्टी करताना मी माझे स्वत्वच विसरलो होतो. प्रसिद्धीच्या मागे कुठेच नसताना आणि ती घेणे माझ्या स्वत:च्याच हातात असताना मी त्यापासून कोसो दूर होतो. चळवळीत तरूण घडत होते, पण या प्रक्रियेपासून दुसर्‍या बाजूला मी माझ्य अप्रत्यक्ष द्वेषाचाच धनी ठरलो ! कुठलीच पदे न भुषवता, कुठल्याच व्यासपीठावर  न जाता मी कार्यकर्ता म्हणून चळवळीत झोकून दिले होते.

वर्तमानपत्रामधून अधून मधून आंबेडकर विचारधारेला गती देण्यासाठी लिहित होतो तेवढेच!

माझ्याभोवती पेटलेल्या ह्या द्वेष व मत्सराच्या आगीतून बाहेर पडायचे तर मला प्रत्यक्ष चळवळीतूनच बाहेर  पडणे आवश्यक होते. संपर्कातून बाहेर पडणे आवश्यक होते. मी आयुष्यभर कोणताच अपराध केलेला नसताना माझ्यावर अनेकवेळा अपमानजनक परिस्थिती आली. एका बैठकीत तर माझ्यामुळेच कार्यकर्ते दुरावत असल्याचा सूर लागला.

घरी आलो. दोन दिवस विचार केला आणि ज्या संस्था, संघटनेला मी जन्म दिला, तिला जोजवले, पालन-पोषण केले त्याच्या मूळ सभासदत्वाचा पूर्ण राजीनामा देवून मोकळा झालो.

काहीनी तर गोव्याबाहेर माझ्या साहित्यिक मित्राना माझ्यासंबंधी अतिशय चुकीची माहिती देऊन माझ्याविषयी माझ्या मित्रांची मते कलुषीत करण्याचा प्रयत्न केला. चळवळीतील कोणत्याच मित्रांचे मी कसलेच नुकसान केले नव्हते. उलट कोणतीच पदे न घेता प्रत्येकाला पुढे येण्यासाठीच मी धडपडत होतो. विषम व्यवस्थेविरूद्ध झुंजत होतो.  ह्या प्रसंगाने तर मी कोसळूनच पडलो. चार दिवस मी विषण्ण मनस्थितीत घालवले. आत्महत्येचाही एकक्षण मनात विचार येऊन गेला. माझी पत्नी अनिला हिनेच या गोष्टीतून मला प्रेमाची फुंकर घालून मला बाहेर काढले. त्या मुक्त अवस्थेतून नंतर अकादमीक स्तरावर खूपच मोठे काम झाले.

जे माझ्याच स्तरावर होती झ अशी नंतर अनेक कामे झाली. छायाचित्रणाचे खूप मोठे काम झाले. गोवा आणु (sic)(‘आणि’ असावे) गोव्याबाहेर एकंदर चार मोठी छायाचित्र प्रदर्शने झाली. संविधानावर प्रजासत्ताक नावाचे हिंदी, मराठी, कोंकणी आणि इंग्रजी भाषामधून राष्ट्रीय स्तरावर नियतकालिक निघू लागले.

पर्यावरणामध्ये काम करताना ‘पर्यावरण’ नावाचे अनियतकालिक निघू लागले. त्यापूर्वी सामाजिक, इतिहासाचेही परिशीलन करू लागलो होतो.

हे करत असताना संविधानाच्या सर्व अंगाचे यथार्थ दर्शन मला होते होते. त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधूभाव आणि न्याय ह्या मूलभूत तत्त्वांची सांगड मी भारतीय लोकजीनाशी घालू लागलो. त्याच बरोबर ह्या देशातील भौतीक आणि जैविक घटकाना डॉ. बाबासाहेबानी भारतीय संविधानाद्वारे पूर्ण संविधानात्मक अधिकारच प्रदान केल्याचे मला फार मोठे सत्य जाणवले आणि डॉ. बाबासाहेबांच्या भारतीय भौगोलिक सीमाक्षेत्रा  (sic) म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि त्यामधील असलेल्या सर्व जैविक, भौतिक घटकांचे सहअस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी त्याना संरक्षण देण्यासाठी त्यानी केलेला देशातील प्रत्येक अणूरेणूचा विचार माझ्या मनात सतत गुंजारव करू लागला.

आणखी माहिती…

(बाबासाहेब आंबेडकर :आंतरराष्ट्रीय महत्व आणि महात्म्य’ पुस्तकात लेखकाविषयी माहितीतून)

- निवृत्तीला 12 वर्षे शिल्लक असताना नोकरी सोडली
- 'शापित सूर्य', 'बहिष्कृत गोमंतक' ही दोन्ही पुस्तके गोवा विद्यापीठाच्या एम.ए. साठी पाठ्यपुस्तके म्हणून समाविष्ट

नारायण सुर्वे यांच्या 'शुभेच्छा'



(कवी नारायण सुर्वे यांनी दादू मांद्रेकर यांच्या पहिल्या ‘शापित सूर्य’ कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून)

दादू मांद्रेकर हे कवीही आहेत व विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सहभागही आहे. कार्यकर्त्यांचे संवेदनक्षम मन आणि कविचा कलाव्यवहार असा दुहेरी गोफ त्यांच्या मानसिकतेत गुंफलेला आहे. भोवतालचा निसर्ग जितक्या सहजतेने ते न्याहाळतात तितक्याच आत्मियतेने ते गोमंतकीय लोकजीवनाचे साद-पडसादही चित्रीत करतात. गोमंतक प्रदेश हा केवळ निसर्गानेच बहरलेला प्रदेश नाही तर मुख्यत: इथे जगणार्‍या विविध थरांतील लोकजीवनाची स्पंदने, त्यांचे श्‍वास-उच्छवास, ताणतणाव व त्यांचा इतिहास ते आपल्या कवितेमधून व्यक्तवितात. हा काव्यसंग्रह जरी त्यांचा सामाजिक जाणीवेचा आणि प्रस्थापित गुलामगिरी झुगारण्याचा आरसा असला तरी त्यांच्या इतर कविताही अंतर्मुख करणार्‍या आहेत. अलिकडील बहुसंख्य मराठी कविताही केवळ लय, किंवा केवळ निसर्ग किंवा केवळ नाजूक उसासे सोडणारी नाही. ती समोरच्या उपस्थित वास्तवाचा वेध टिपू लागते. ते घनघोर वास्तव शब्दांकित करू पहाते. हा आजच्या बदलत्या काळाचा युगधर्मच आहे. याचा अर्थ नादमय कविता दुय्यम आहे असे नाही, तर ती लयबद्धता व तालतोल सांभाळीत स्वत:चा असा वेगळा अविष्कार करू मागते. ती वेगळा विचार मांडू पहाते. ती अधिक धिटाईने समाजमनाशी संपर्क साधू पहाते. विशेषत: ही कविता आत्यंतिक व्यक्तिगत समोरच्या जनमानसाशी काही बोलू मागते. मी आणि माझे समोरचे वास्तव याच्या ताणात ती सहानुभूतीने वावरू लागते व मला हे एक शुभचिन्ह घडते आहे असे वाटते.

दादू मांद्रेकरांची कविता ही एका अस्वस्थ मनाच्या आतील कल्लोळाचे दर्शन घडवते. समाजव्यवस्थेचे दु:ख चितारते व तोही एका विशिष्ट शैलीत कल्लोळाना शब्दांकितत करताना पाहिले की आनंद होतो.

...दादू केवळ दलित समाजातील आहेत म्हणूनच इतके तिखट आणि जहाल शब्दात बोलतात असेच मानावयाचे काही कारण नाही. ते समग्र दलितांविषयी आजच्या बदलांच्या सर्व धारणा मनात वागवून एकाच चौकटीत फिरत नाहीत. एक संस्कारक्षम दलित मन जीवनातल्या विसंगतीविषयी जेव्हा स्वत:च्या प्रतिक्रिया व्यक्तवू मागते तेव्हा त्याचा मनातील कल्लोळ आपण समजून घेतला पाहिजे असे मला वाटते.

...दादूच्या मानसिकतेतला सर्व कल्लोळ त्यांच्या इतर कवितातही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र विखुरलेला आहे. शब्दांकित झालेला आहे.

दादूच्या एकूण कवितेचा पिंड हा परिवर्तनवादी मनाचा व समोरचे भीषण वास्तव, खोटी कर्मकांडे आणि माणसातील उच्चनीचतेचा भाव बदलला पाहिजे असा आहे. तरीही दादूने काव्यरचनेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्याच्या काही रचना खूपच पसरट वाटतात तर काही ठिकाणी नेमके थांबायला पाहिजे तेथे त्यांचा अधिक विस्तार होताना आढळतो व मग रसभंग झाल्यासारखा होतो. काव्यलेखनातील सर्व धोके, मोह टाळता आले पाहिजेत. घाई करता कामा नये आणि विपुल लेखन हाच काही साहित्याचा मानदंड नाही. गुणात्मकतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु जो चिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो तो स्वत:ची वाट शोधतोच नव्हे तर ती त्याला सापडते. यापुढच्या दादूच्या अधिक सकस कवितांकडे मी लक्ष ठेवून आहे.

उसळलेल्या संवेदनाना दादूने मोकळीक करून दिलीच आहे ते उद्रेक अधिक वाढत राहतो.

शुभेच्छांसहित -
नारायण सुर्वे
20 जुलै 90

कवितेच्या ‘वेशीवरून’


(शापित सूर्य या दादू मान्द्रेकर यांच्या कवितासंग्रहातील मनोगतातून हा भाग घेतला आहे. आयु. मान्द्रेकर यांची कवितेविषयीची वाटचाल, दृष्टिकोन कळण्यास मदत होईल वाटले म्हणून)



मी कविता करण्यास (किंवा मला ती स्फुरण्यास )कधीपासून सुरवात केली (sic) याचे नक्की साल मला आता आठवत नाही. पण ती माझ्या वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षापासून असवी. कारण त्यावेळच्या माझ्या कविता आज माझ्याकडे नाहीत. साधारण साठ-सत्तर कवितांची वही मी माझ्याच हाताने नष्ट केली. मी वीस वर्षांचा असताना त्या कविताकडे मागे वळून ज्यावेळी पाहिले त्यावेळी त्यात माझ्या जगण्याचे प्रतिबिंब मला अजिबात जाणवले नाही.  माझं सत्व त्यात जाणवलं नाही.


याची कारणं असेक आहेत. त्यात उशिरा पडलेलं दलित साहित्याचं देणं हे जसं एक प्रमुख कारण आहे, तसेच खूप उशिरा कळलेला, मनस्वी जाणवलेला आणि माझ्या रोम रोम (sic) भिनलेला, भावलेला आंबेडकरवाद हेही त्याचे दुसरे एक प्रमुख कारण आहे.


बालकवीच्या कवितेनेे मला प्रारंभी जबरदस्त मोहिनी घातली. माझ्या काव्यप्रेरणेचे मूळ कदाचित ते असेेल नसेल, पण उत्स्फूर्तता मात्रतीच होती हे मी नक्की सांगेन. त्यानंतर दलित कवितेेची ओळख होईपर्यंत अनेक प्रस्थापित कवी पाठ्यपुस्तकातून भेटत गेले  आणि माझ्या मनावर पर्यायाने माझ्या कवितेवर आपला ठसा कळत नकळत उठवित गेले. याच्यात सम्यक विचारधारेचा जसा अंतर्भाव नव्हता तसा समग्र समाजपरिवर्तनाचाही विचार नव्हता. युगानूयुगाच्या मनावर प्रतिबिंबित झालेल्या माझ्या सांस्कृतिक गुलामीच्या त्या कविता म्हणजे एकप्रकारे साक्षीच होत्या !

एखाद्या कवीचा त्याच्या पूर्ण कवितांचा काव्यसंग्रह असतो हे सुद्धा ज्या वयात (अर्थात माझ्या बाबतीत मी 18-19 वर्षांचा असताना) मला माहित नव्हते, त्या वयात हे घडत गेले.  या काव्यसंग्रहाला ज्यांची प्रस्तावना लाभलेली आहे त्या  गुरुवर्य नारायण सुर्वे यांचीही एक ‘जगणे कठीण होत आहे’ नावाची कविता पाठ्यपुस्तकातून गेली होती. या कवितेकडेसुद्धा मी जबरदस्त आकर्षिला गेलो. सामाजिक जाणीव म्हणजे नेकके काय हे ज्यावेळी मला माहित नव्हते त्यावेळीही माझ्या सामाजिक जाणीवेचा कोपरा जागा होता आणि म्हणूनच मी त्या कवितेकडे आकर्षिला गेलो होतो याची कारणं आज उलगडत जातात.


माझं स्वत:चे (sic) एक दु:ख आहे. तडप आहे. वेदना आहे याची जाणीव मी अठरा - वीस वर्षांचा होईपर्यंत मला नव्हती. त्यामुळे माझ्या पहिल्या कवितामधून प्रसवला तो इतर कवींचा प्रभाव.  त्यातही बालकवीचा अधिक. अर्थात हेही मला जाणवले ते माझ्या विसाव्या वर्षानंतर. ज्यावेळी माझा स्वाभिमान, माझी मानवतेची प्रतिमा, समतेची संकल्पना, माझी अस्मिता तयार झाली होती त्यामुळे ! त्यामुळष ह्या माझ्यापूर्वीच्या कविता वाङ्मयीनदृष्ट्या नष्ट करणे योग्य नाही हे पटूनही त्या सातत्याने माझ्यासमोर ठेवणे मला प्रशस्त वाटले नाही. पर्यायाने मी त्या फाडून टाकल्या. त्या फाडून टाकल्या म्हणून त्याचे वैषम्य किंवा दु:ख तसे आजही मला वाटत नाही. उलट डोक्यावरचे ओझं (sic) कुठतरी कमीच झाल्यासारखं वाटतं !


माझ्या सामाजिक कवितेतील संदर्भ ज्यावेळी जागा झाला त्यावेळीही दलित कवितेबरोबरच ग्रेसने माझ्या मनात एक घर केले होते. याच कारण पुन्हा माझा निसर्गाच्या विभिन्न रूपाशी किंवा त्या प्रतिभेशी तादात्म्य पावणारा पिंड हे असू शकेल. ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’(sic) या त्यांच्या कवितासंग्रहाच्या मी अक्षरक्ष: (sic) काही काळ धुंदीत होतो; पण त्याही धुंदीतून मी जाणीवपूर्वक बाहेर पडलो आणि माझी स्वत:चीच पाऊलवाट तुडवित राहिलो. कोणत्याही कवीचा आज माझ्या कवितेवर प्रभाव नाही असाही माझा दावा नाही, पण त्यानंतर कोणत्याही कवीला मात्र मी माझ्या मनस्पंदनावर जाणीवपूर्वक ताबा मिळवू दिला नाही हेही सत्य आहे.


...माझी कविता ही स्सखलनशील (sic) आहे की नाही याची मला जाणीव नाही. ती ज्वलनशील  आहे की नाही याचीही मला कल्पना नाही; पण माझी कविता ही अस्सल माझ्या वेदनांची वीण आणि वीणा झालेली आहे. भारतीय विषम समाजव्यवस्थेची भीषण, दारुण आणि करुणही शोकांतिका कोरीत ती जखमेसारखीच वहात आहे हे सत्य होय.


कळायला लागल्यापासून तिचे मापदंड ठरवून मी तिला काही प्रसवले नाही; पण तेव्हापासून रौरावत उठलेली मनातील वादळे मी माझ्या कवितेपासून लपवूनही ठेवू शकलो नाही. त्यामुळे माझ्या उद्विग्न मनाचा, पोळलेल्या स्वप्नांचा, भोगलेल्या शल्यांचा आणि जगलेल्या जाणीवांचा पुन्हा प्रत्यय रसिकाना येण्याचा धोका नाकारता येत नाही. पेटलेला पलिता हातात असावा आणि त्याच्या काजळलेल्या, अंधारलेल्या उजेडात काट्याकुठ्यांची, दगड-धोंड्यांची, दरी-कपारीची पायवाट असली तर किंवा नसली तर ती करीत पुढे जावे असेच काहीसे माझ्याबाबतीत महाकारुणिक बुद्ध आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण प्रज्ञेचा पलिता माझ्या हातात पडल्यानंतर झाले. माझ्या कवितेचा गाभा तोच आहे. आवाजही तोच आहे. हे कोणी स्वीकारो, नाकारो. पण हे मला सांगण्यास निरतिशय आनंद होत आहे. म्हणून कविता माझ्याकडून घडायला लागल्यापासून मराठी कवितेच्या तेव्हाच्या (आणि आताच्याही) स्वरूप, रचनेविषयीचे स्थान किंवा त्याचे मर्मबंध, आकृतीबंध जे काय असतील ते मी अभ्यासण्याचे किंवा तपासण्याचे प्रयत्न केले नाहीत. प्रारंभीच्या काळात एक छंद म्हणून हा प्रयत्न झाला, पण तो त्या नष्ट केलेल्या कविताबरोबर नष्टही झाला असावा. त्यामुळे माझी कविता ही त्या प्रस्थापित आकृतीबंधापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची फिकीरही नाही.

***

आणखी थोडे.(‘ओंजळ लाव्हाची’ कवितासंग्रहाच्या ‘मनोगता’तून)

बाबासाहेब-बुद्ध-ज्योतिबा हे माझे आदर्श. त्यांचे विचार म्हणजे चंदन अग्नी. शापित सूर्या नंतर त्याच पद्धतीची कविता ह्या दुसर्‍या कविता संग्रहात वाचकांना वाचायला मिळेल. बाबासाहेबांचे एक रूप म्हणजे ज्वालामुखीचेच रूप. सतत जाळणे आणि त्यातून नवे सृजन जन्माला घालणे हा आंबेडकरी विचारांचा गाभा. त्या गाभ्याचे अंतरंग म्हणजे हा कविता संग्रह. ही कविताही पचवणे वाचकांना जड जाईल.
पंचवीस वर्षांत दोनशे पंचवीस तरी कविता स्फूरायला हव्या होत्या, पण तसे माझ्या बाबतीत होत नाही. एखादी कविता स्फूरली तरी ती क्वचितच एका बैठकीत पूर्ण होते. अन्यथा कित्येक वेळा कविता पूर्ण व्हायला महिनोन महिने लागतात.
माझ्या बाबतीत फुला-मुलांची कविता मला सहजस्फूर्त असते, पण सामाजिक परिवर्तनासाठी त्या कवितेचा काही उपयोग होत नसतो याची मला अगदी मी 18-20 वर्षांचा असताना एकदा मला जाणीव झाली आणि ती कविता मला सहजस्फूर्त असूनही मी त्याच्यामागे मागे धावलो नाही. एक निर्भेळ आनंदासाठी तशी कविता ठीक आहे. सामाजिक परिवर्तनासाठी कविता उपयुक्त नाही !
परिवर्तनवादी कविता मी वर म्हटल्याप्रमाणे एक प्रकारचा वैचारिक अग्नी, प्रलयच असतो आणि विशेष म्हणजे तो आंबेडकरवादी कवितेतून अगदी प्रत्ययास येतो !
माझी कविता ही अशीच आहे. ‘शापित सूर्य’ झाल्यानंतर हा दुसरा काव्यसंग्रह.
या काव्यसंग्रहाचे नामाभिमान (sic) काय असावे या विचारात असतानाच ही एक काव्य पुष्पांजलीच आहे याची मला एकाएकी जाणीव झाली, पण ओंजळीत फुलाऐवजी अंगार भरलेले आहेत आणि ती ओंजळ आपण कोणत्या तरी नव्या निर्माणासाठी कोणाला तरी अर्पण करत आहोत असे चित्र समोर आले. त्याचवेळी लाव्हा ओकणारा पर्वतही समोर आला आणि या काव्यसंग्रहाला एक समर्पक नाव मिळाले ‘’ओंजळ लाव्हाची...!’
नित्याच्या घडामोडीवर परखड भाष्य करणार्‍या चार-सहा ओळींच्या कवितांची दैनंदिन प्रहसनात्मक सदरे मी अनेक वर्षे लिहित आलो. ती कोण लिहितो हे सामान्य वाचकांना अजूनही माहित नाही. हे एक वैचारिक प्रहसनच असते ! त्यामुळे अशी कविता मला स्फुरणे हा माझ्या (sic) स्थायीभाव आहे, पण या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेल्या कविता स्फूरतानाचा आशय हा मनात कित्येक दिवस धुमसत असायचा !
माझे मन अतिशय जागृत असते. ते अतिशय तरल आणि संवेदनशील असते. त्यामुळे कुठल्याही अवतीभवती घडलेल्या घटनांचे साद-पडसाद लगेच माझ्या मनावर उमटतात. अन्याय आणि बदमाशगिरी यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात.
... माझे शब्द हेच माझे हत्यार. मी शब्दानी तलवारीसारखे सपासप वार करतो. माणसाच्या, राष्ट्राच्या भवितव्यासाठी जे शब्द वज्रासारखे माझ्यासमोर फेर धरून नाचतात, तसेच आजही मृदू मुलायम शब्द एखादी निसर्गाची कविता स्फूरताना माझ्यासमोर फेर धरून नाचतात.
...पण अश्या कवितानी एक निखळ आनंद मिळतो तेवढाच ! बाकी सामाजिक परिवर्तनाचा एकही अणू एइकडून (sic) तिकडे हालत नाही. त्यामुळे मी निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेलो असूनही मी अश्या कवितांच्या आहारी गेलो नाही.
आज जे लाव्हाचे रूप आहे तेच एकवेळ पूर्ण पृथ्वीचे रूप होते. कालांतराने पृथ्वी थंड पडत गेली आणि तिने पृथ्वीवर आज जे आपल्याला दिसते ते सृजन घडवले. ! माझ्या आग ओकणार्‍या कवितेकडूनही मी हीच अपेक्षा ठेऊन आहे.
भारतातल्या सामान्य माणसाचे देवा-धर्मावर चालणारे शोषण थांबले पाहिजे आणि जाती-धर्म, कर्मकांड आनी (sic) ईश्‍वर, देव या सार्‍या नरकातून सामान्यातला सामान्य माणूस बाहेर आला पाहिजे हिच माझी अंतिम इच्छा आहे !
माझी कविता त्यादृष्टीने कारण ठरली तर मला निरतिशय आनंद होईल!


‘बहिष्कृत गोमंतक’विषयी

(समीक्षक डॉ. बाळकृष्णजी कानोळकर यांच्या ‘गोमंतकीय साहित्यातील शोधस्थळे’ पुस्तकातील ‘गोव्यातील दलितांविषयीचा सामाजिक दस्तऐवज : ‘बहिष्कृत गोमंतक’ या प्रकरणातून निवडक भाग)

...सामाजिक पातळीवर ‘आम्ही कोण?’ या स्वरूपात इथल्या शिशित दलित तरुणाला पडला. त्याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करू लागला, संघटितपणे करू लागला. या अशा प्रयत्नांचे फलित म्हणजेच आयुष्यमान दादू मांद्रेकर आणि ‘बहिष्कृत गोमंतक’ हा त्यांचा ग्रंथ.

आयु. दादू मांयाद्रेकर हे इथल्या मराठी साहित्यविश्‍वाला तसे परिचयाचे आहेत. ते एक कवी, विचारवंत म्हणून ज्ञात आहेत. या सर्वांपेक्षा ते एक चळवळ्या आहेत, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ते चळवळ्या आहेत आणि म्हणूनच इथे या प्रदेशात दलितांच्या प्रश्‍नांसंबंधाने ज्या ज्या काही चळवळी आजवर उभारल्या गेल्या त्या सर्वांमध्ये त्यांचा सहभाग आहेच. अशा चळवळीतून आलेले अनुभव, त्याचे खूप मोठे भांडारच त्यांच्यापाशी आहे. त्यातील काही अनुभवांना दिलेले शब्दरूप म्हणजेच हा ‘बहिष्कृत गोमंतक’. यापूर्वी त्यांचा ‘शापित सूर्य’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोमंतकातील दलित मराठी कवितेचे खर्‍या अर्थाने प्रतिनिधीत्व करणारा असा हा त्यांचा कवितासंग्रह आहे. तर ‘बहिष्कृत गोमंतक’ची पांढरी गावकूर ही अशी आहे.

... या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणातून लेखकाने, जशी आपली ‘घुस्मट’ मांडलेली आहे त्याचप्रमाणे त्या विषयीची प्रचंड चीड, विद्रोहाचा एक अंत:प्रवाह या अत्यंत ललितरम्य भाषेच्या कुसुमकुंजात लपलेल्या  जहाल सर्पदंशाचा वा खदखदणार्‍या  अंतस्थ लाव्हारसाचा दाहक प्रत्यय कुणाही सजग वाचकाला आल्याशिवाय राहणार नाही.

... या कथन निवेदनातून व्यक्त झालेले हे वास्तव केवळ दलित समाजाच्या वाट्याला आलेलेच वास्तव नसून ते इथल्या काबाडकष्ट करून हाताच्या पोटावर जगणार्‍या इतरही समाजाचे कमी-अधिक प्रमाणात वास्तव आहे. त्यामुळे हे ‘कथन’ सार्वत्रिक दु:ख वेदनेचे रूप घेऊन वाचकांच्या समोर येत राहते. तरीही यातील प्रत्ययास येणारे जीवन हे प्रामुख्याने गोव्यातील खेडेगावांमधून वस्ती करून राहणार्‍या महार समाजाचे आहे. पुन: हा समाजही सजग, जागृत होऊ लागल्याच्या खुणा या कथनातून जागोजागी मिळतात. तसेच हा समाज एका परिवर्तनाच्या सरहद्दीवरचा ढीरपीळशपीं झशीळेव मधला आहे, याचे संदर्भ या कथनातून जागोजागी स्वत:चा परिचय करून वाचकाला देत राहतात. तसेच या समाजाचा परिचय आधुनिक शिक्षण, जीवनपद्धती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार, त्याचप्रमाणे नवबौद्धांचा ‘धम्म’ इत्यादी नव्याच, त्यांना आजवरच्या अज्ञात, नव्या असलेल्या ‘वस्तू’शी झालेला आहे, हे कळून येते.

...दादू मांद्रेकरांनी इथल्या दलित समाजाच्या एकूणच चित्रण करणारा, खरे तर त्याचे अस्सल रूप दाखविणारा असा हा ‘आरसा’ आपल्या या ग्रंथाच्या रूपाने तुम्हा-आम्हा समोर धरलेला आहे. त्यापासून जो काय बोध घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा.

‘पर्यावरण’ आणि ‘प्रजासत्ताक’


दादू मांद्रेकर यांनी ‘प्रजासत्ताक’ हे वार्षिक व ‘पर्यावरण’ हे अनियतकालिक संपादित केले. पैकी वार्षिकाचे २००६ ते २०१४ असे आठ अंक तर अनियतकालिकाचे 2012 व 2013 असे दोन अंक निघालेले दिसतात. ‘प्रजासत्ताक’चा २००९चा अंक निघाला नाही. 

श्री. समीर झांट्ये यांनी 2010 सालच्या ‘प्रजासत्ताक’ वार्षिकावर परीक्षण लिहिले होते. ते खाली दिले आहे. त्यावरून या अंकांंच्या रचनेची कल्पना येऊ शकेल. पर्यावरण अंकात गोव्याचे पर्यावरण, पर्यावरण संवर्धन, परिसंस्था अशा विषयांवर आधारित लेख दिसतात.

अंकाची मुखपृष्ठे खाली दिली आहेत. अंक संपादक दादू मांद्रेकर यांच्याकडे उपलब्ध झाले. त्यासाठी त्यांचे आभार.
****

संविधानाचा संस्कार रुजवू पाहणारे ‘प्रजासत्ताक’

(दै. नवप्रभा च्या रविवार दि. 14 मार्च 2010च्या रविवार ‘अंगण’ पुरवणीत समीर झांट्ये यांनी लिहिलेले ‘प्रजासत्ताक’चे परीक्षण)

कुशल दृष्टिकोन लाभलेले छायाचित्रकार म्हणून नव्याने आपली ओळख प्रस्थापित केेलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कवी दादू मांद्रेकर यांनी संपादित केलेल्या ‘प्रजासत्ताक’ वार्षिकाचा यंदाचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भारतीय संविधानाचे अर्थगर्भ दर्शन तळागाळात घडविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून ते हा उपक्रम सातत्याने राबवित आहेत.

‘प्रजासत्ताक’ने भाषा, प्रांताच्या मर्यादा ठेवलेल्या नाहीत. यात विविध भाषांतील, भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे यात प्रकाशित होणारे लेखन हे त्याचे प्रमाण आहे. अंकात ठिकठिकाणी आंबेडकरवाद व बुद्धविचारांचे प्रतिबिंब सापडते. डॉ. आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार असल्याने व त्यांनी बुद्धाकडून प्रेरणा घेतल्याने ते तसे अपरिहार्यही आहे. तरीही देशाची घटना हाच या विशेषांकाचा केंद्रबिंदू आहे. घटनाधारित स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व धर्मनिरपेक्षतेचा संस्कार देशात रुजविणे हा अंकाचा उद्देश दिसतो. भारतीय राज्य घटनेला या देशाचा पवित्र ग्रंथ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी तमाम देशवासीयांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी या अंकाने स्वीकारल्याचे  हिंदीतून लिहिलेल्या संपादकीयातून ध्वनित होते. देशाच्या विविध भागांतून लेखकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता भारतीय संघराच्याच्या संविधानातून मूळ स्वर घेऊन राष्ट्रबांधणीचे स्वप्नगीत गाऊ पाहणारे हे एक राष्ट्रीय नियतकालिक बनत चालले आहे, असे म्हणता येईल.

भारतीय घटनेच्या विविध अंगांचे दर्शन घडविणारे, संविधानाची पार्श्‍वभूमी सांगणारे, त्याच्या अक्षरांकित अर्थाच्या पुढे जाऊ इच्छिणारे असे मान्यवरांचे लेख, तसेच इतर संकलित लेखन असे या विशेषांकाचे स्वरूप आहे. बुद्ध शरण हंस (पटना) यांचा ‘अगर बाबासाहेब अम्बेडकर भारतीय संविधान के जनक नहीं होते...’, मनोहर रणपिसे (मुंबई) यांचा ‘संविधानातील मानवतावाद’, डॉ. डी. टी. गायकवाड यांचा ‘भारतीय संविधानाचा सरनामा-अवलोकन व आकलन’, प्रकाश कामत यांचा ‘ज्युडिशरी अ‍ॅण्ड मिडीया’ आदि लेखांचा अंकात समावेश आहे. याशिवाय बुद्ध विचारांचा उहापोह करणारा ‘बुद्ध अथवा कार्ल मार्क्स’ व दलित चळवळीतील ज्येष्ठ आणि कृतिशील कार्यकर्ते प्रा. अरुण कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा ‘प्रा. अरुण कांबळे सर : आंबेडकरी विचारांची अस्मिता’, असेे लेखही यात आहेत.

अंकाच्या शेवटी कवितांचा विभाग आहे. त्यात आंबेडकरांशी निगडीत अशा कविता दिसतात. अशाच एका ‘पुस्तक’ या कवितेत आनंद गायकवाड म्हणतात -

तुमच्या सार्‍या पुस्तकांना
पुरून उरतं एकच पुस्तक
जे कायद्याच्या अन्
माझ्या बापानं लिहिलं आहे…

दादू मांद्रेकर यांच्याही अनेक कविता या विभागात आहेत. त्यापैकी ‘महानायक’ ही एक हिंदी कविता आहे. आर्य संस्कृतीच्या मागे जाउन स्वत:चे अस्तित्व कवी याठिकाणी सांगतो -

मारे मानवतावादी सभ्यता पर आक्रमण करनेवाले
आर्योे को थमाने वाले हम ही तो थे
और बाद में उसके विषम संस्कृती के
स्तंभ उखाडकर फेकनेवाले
हम ही तो थे
उसके बाद बुद्ध के जन्म का जश्‍न मनानेवाले
बुद्धत्व को साथ देनेवाले हम

लेखणीच्या ताकदीवर जातिव्यवस्थेवरील समाजरचना उद्ध्वस्त करून टाकण्यास सज्ज झालेला मुखपृष्ठावरील एक ‘विद्रोही’ चेहरा आणि लगेच (पानाच्या) आतल्या बाजूने बुद्धाची शांत-स्थीर मुद्रा ही दोन्ही बळी खैरे (यवतमाळ) यांची रंगचित्रे लक्ष वेधून घेतात. त्यानंतर सुरुवातीच्या पृष्ठांवर हिंदी, इंग्रजी व मराठीतून घटनेचे प्रास्ताविक ‘प्रिएम्बल’ देण्यात आले आहे.

अंकाची छपाई, मुद्रण, मजकुराचे सादरीकरण पाहता अंकाची प्रगती गुणात्मकदृष्ट्या सकारात्मक होत आहे. अंकाचा व्याप एकहाती सांभाळूनही त्याची गुणवत्ता टिकवून त्यात वृद्धीसाठी झटणार्‍या संपादक दादू मांद्रेकर यांचे त्यासाठी अभिनंदन करायला हवे.

प्रजासत्ताक (2010)
संपादक : दादू मांद्रेकर
प्रकाशन : अनिला मांद्रेकर
***




प्रजासत्ताक वार्षिकाची मुखपृष्ठे 


अंक  1 ला  - 2006

अंक  2 रा  - 2007

अंक  3 रा  - 2008

अंक  4 था - 2010

अंक  5 वा  - 2011

अंक  6वा   - 2012

अंक  7 वा  - 2013

अंक  8 वा   - 2014


'पर्यावरण'च्या दोन अंकाचे मुखपृष्ठ . 'पर्यावरण'चे २०१२ व २०१३ असे दोनच अंक निघाले.