फोटोग्राफीविषयी


दादू मांद्रेकर फोटोग्राफीकडे वळले. गोव्याच्या कानाकोपर्‍यात फिरून हजारो छायाचित्रे टिपली. त्यावर आधारित ‘सुखदु:खाच्या पलिकडे’ या नावाने गोवा तसेच गोव्याबाहेर त्यांची प्रदर्शनेही झाली. 

''सौंदर्य -माधुर्याचा एक क्षण जगतो मी ।
टिपलेल्या क्षणात विश्‍वधर्म शोधतो मी ॥''

या शीर्षकाची एक लेखमाला दादू मान्द्रेकर यांनी 2006 वर्षी दै. नवप्रभाच्या रविवार ‘प्रभावळ’ पुरवणीतून चालवली. आगळे वेळगे असे हे सदर ठरावे.आपली टिपलेली छायाचित्रे आणि त्यामागची कहाणी असे त्याचे साधारण स्वरूप होते. लेखमालेतील सुरुवातीचा लेख हा त्यांच्या छायाचित्रणाबाबत माहिती देणारा होता. तो दि. 04/06/06 रोजी प्रसिद्ध झाला होता. तो लेख खाली नोंद केला आहे. लेखाच्या खाली श्री. दादू यांची निवडक छायाचित्रे दिली आहेत. 


*************



कहाणी तशी रोचक आणि रोमांचक. साधारण वर्षापूर्वी कॅमेरा हातात आला आाणि मीच मला शोधत गेलो. सौंदर्याच्या आवर्तात...गूढतेच्या आवर्तनात. छळाला कंटाळून आणि कलागुण संपन्नतेला, कार्यक्षम असूनही माझ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सरकार दरबारी काडीचीही किंमत नसल्याचे पाहून व वशिलेबाजीने माझ्यावर चढणारी कर्तबगार शून्य, अकार्यक्षम माणसे पाहून शासकीय नोकरीला रामराम ठोकला. मुक्त मुक्त झालो. कधीतरी कोणाच्यातरी कॅमेर्‍याने चार-दोन छायाचित्रे घेतली, तेवढीच. त्यापलिकडे तसा छायाचित्रणाचा अनुभव नव्हता. इलेक्ट्रॉनिकने इतर क्षेत्रांप्रमाणे छायाचित्रणाचा अनुभव नव्हता. इलेक्ट्रॉनिकने इतर क्षेत्रांप्रमाणे छायाचित्रणातही धमाल माजवली हे वाचत होतो. ज्याच्याशी भविष्यातही माझा संबंध येणार नव्हता, त्या क्षेत्राचे अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रश्‍नही उद्भवत नव्हता. छायाचित्रण, कॅमेरा  हाताळणी याच्यासारख्या बाबींशी माझा संबंध आलाच नाही. एल.अ‍ॅण्ड एम. सारखा कॅमेराही कधी हातात घेऊन पाहिला नाही. मग फोटो काढणे दूरच. रोल घालून साध्या कॅमेर्‍यातून काही फोटो क्लिक केेले तेवढेच. त्यामुळे डिजिटल कॅमेर्‍यातील गंमतीजमती आणि फिक्सल याच्याबाबतीत माझे पराकोटीचे अज्ञान. मी त्या बाबतीत अक्षरश: निरक्षर.

तरीपण ठरवले; इतकी वर्षे साधा कॅमेराही घेतला नाही. आता घेऊया आणि तोही डिजिटल घेऊया. त्यापूर्वी कशाला तरी कामी येईल, म्हणून  एक संगणकही खरेदी केला. त्यातही ज्ञान शून्य. कॉम्पुटरचा आणि डिजिटल कॅमेर्‍याचा परस्पर काही संबंध  आहे, एवढे सर्वसामान्य ज्ञानही नव्हते.

‘सुनापरान्त’चे गुणसंपन्न छायाचित्रकार राज तिलक यांच्या सल्ल्यानुसार आणि सहकार्याने थोडा स्वस्तातला एक ‘कोडॅक’चा दोन मॅगापिक्सचा कॅमेरा घेतला. मॅगाफिक्ससंबंधी रोज काही तरी सांगितले; पण ते समजून घेण्याच्या मानसिकतेत मी नव्हतो असे म्हटले तरी चालेल; कारण माझ्या छायाचित्रणात काही करून दाखवण्याचा माझा विचार नव्हताच. कॅमेरा हवा होता तो एक हौस म्हणून.

- पण कॅमेरा घेतला आणि छायाचित्रण सुरू झाले. छायाचित्रे संगणकातही  उतरून घेता येतात, हे प्रेमानंद नाईकसारख्या मित्राने दाखवले आणि माझी निसर्ग छायाचित्रे अप्रतिमही असल्याचे सांगितले. त्याच्या संगणकावर प्रतिमाही वृद्धिंगत करून दाखवल्या. एवढी अप्रतिम छायाचित्रे असतील याची मला कल्पना अजिबात नव्हती. पण मी संगणकाच्या पडद्यावर काहीतरी माझे नवीनच पहात होतो. तरीही छायाचित्रणाच्या क्षेत्रात मी काही करून दाखविन किंवा करून दाखवावे, असे काही वाटले नाही.

अजून काही मित्रांनी ही निसर्ग छायाचित्रे पाहिली आणि त्यानी पाठीमागे धोशाच लगावला - तुला छायाचित्रणाचे एक अंग आहे. नजरही आहे. ययार्थवादी दृष्टिकोन आहे आणि खरे म्हणजे तुझा पिंड साहित्याबरोबर एका सृजनशील कलाकाराचा आहे. तेव्हा याही क्षेत्रात शीर पण ते करावयाचे झाल्यास हा दोन मॅगाफिक्सचा कॅमेरा कुचकामी आहे. घेतलेल्या छायाचित्रांच्या मोठ्या प्रिंट्स काढून पाहिल्या आणि माझा मीच हरवून गेलो. मी घेतलेल्या छायाचित्रात नेमके काहीतरी आहे. ते बघणार्‍याला अंतर्मुख करते, याची जाणीव व्हायला लागली. पण खरोखरच छायाचित्रणात माझे असे खास काही होईल, असे वाटतच नव्हते... समोर असलेल्या त्या प्रिन्ट्स मला मात्र सातत्याने पुकारत असल्याचे जाणवत होते.

शेवटी निर्णय घेतला-कॅमेरा बदलायचा. अधिक क्षमता आणि अधिक काही असलेला किमान किमतीचा कॅमेरा घ्यायचा तरी त्याला वीस हजार रूपये हवे होते.

पेन्शन गहार ठेवली आणि निकॉनचा 5.1 मॅगाफिक्सचा कॅमेरा घेतला. त्याने माझ्या जीवनातले काव्य आणि वास्तवता अधिक ययार्थ केली.

केवळ सहा महिन्यात साधारण दोनशे छायाचित्रे असलेली दोन प्रदर्शने, मलाही आज विचार करणे कठीण जातेय.

एकाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार डॉ. सुबोध केरकर यानी तर दुसरे उद्घाटन एक प्रतिभासंपन्न कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक पटकथालेखक गुलजार यानी केले.

‘या छायाचित्रांविषयी कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही, ती चित्रे स्वत:च तुमच्याशी हितगूज करतात’ हे गुलजार साहेबांचे उद्घाटनप्रसंगीचे उद्गार माझ्या ह्रदयात पेटवलेल्या एका अगदी इवल्याल्या सृजनशील, सत्शील मिणमिणत्या पणतीची ज्योत करून गेले.

निसर्ग आपला सखा, सोबती, मार्गदर्शक सर्व काही असतो. आम्हा पामराना खरे म्हणजे त्याच्या अंतरंगात शिरण्याची आणि त्याच्याशी प्रगाढ मैत्री करण्याची साधी अक्कलदेखील नसते. मी भारतात अनेक ठिकाणी फिरलो. माझ्या पुण्यभू मातृभूमीसारखे निसर्गवैभव चुकूनच मला दिसले.

हा निसर्गाचा इतिहास, ती गुढता, ती अभिव्यक्ती, ते सौंदर्य, ती निरागसता, ते अल्लडपणा, तो उच्श्रृंखलपणा लोकांपर्यंत न्यावा, असे सतत वाटले.

गेल्या वर्षभराचा हा सृजनशील सोहळा लिखित स्वरूपात लोकांपर्यंत गेला तर...
प्रत्येक छायाचित्राला, त्या स्थळाला एक उत्क्रांतीचे वरदान आहे. त्याचीच ही चित्तरकथा...

चित्र पहिले दिसते. अर्थ प्रतीत होतात आणि एका क्षणात छायाचित्रात काव्य होते.

अगदी ज्ञात असलेल्या भाषेतून सहजस्फूर्त अशी एखादी काव्यपंक्तीदेखील सुचते. कवितेसह छाया...विचार करणे अगदी गोड लखलखत्या काळजासारखे.

‘सुख - दु:खाच्या पलीकडील’ अनुभूती, प्रदर्शनाची नावेही तीच होती.

या छायाचित्रानी माझ्यातला माणूस अधिक व्यक्त केला. त्याहीपेक्षा त्यानी गोव्यातील त्या त्या स्थळांचा निसर्गाचा इतिहास अधिक सजीव केला आहे.

*****








'प्रजासत्ताक' वार्षिकच्या  २००७च्या अंकात दादू मांद्रेकर यांची ही  छायाचित्रे प्रकाशित झाली  होती.  ही  त्यांनीच टिपलेली  छायाचित्रे आहेत याची त्यांच्याकडे शहानिशा करून त्यांच्या फोटोग्राफीची कल्पना यावी यासाठी श्री. मांद्रेकर यांच्या परवानगीने येथे दिली आहेत. ब्लॉगकर्त्याकडे व्यावसायिक उपकरणे नसल्याने चित्रांच्या स्कॅनिंगची गुणवत्ता पूर्णपणे राखता आलेली नाही त्यासाठी दिलगिरी.