‘पर्यावरण’ आणि ‘प्रजासत्ताक’


दादू मांद्रेकर यांनी ‘प्रजासत्ताक’ हे वार्षिक व ‘पर्यावरण’ हे अनियतकालिक संपादित केले. पैकी वार्षिकाचे २००६ ते २०१४ असे आठ अंक तर अनियतकालिकाचे 2012 व 2013 असे दोन अंक निघालेले दिसतात. ‘प्रजासत्ताक’चा २००९चा अंक निघाला नाही. 

श्री. समीर झांट्ये यांनी 2010 सालच्या ‘प्रजासत्ताक’ वार्षिकावर परीक्षण लिहिले होते. ते खाली दिले आहे. त्यावरून या अंकांंच्या रचनेची कल्पना येऊ शकेल. पर्यावरण अंकात गोव्याचे पर्यावरण, पर्यावरण संवर्धन, परिसंस्था अशा विषयांवर आधारित लेख दिसतात.

अंकाची मुखपृष्ठे खाली दिली आहेत. अंक संपादक दादू मांद्रेकर यांच्याकडे उपलब्ध झाले. त्यासाठी त्यांचे आभार.
****

संविधानाचा संस्कार रुजवू पाहणारे ‘प्रजासत्ताक’

(दै. नवप्रभा च्या रविवार दि. 14 मार्च 2010च्या रविवार ‘अंगण’ पुरवणीत समीर झांट्ये यांनी लिहिलेले ‘प्रजासत्ताक’चे परीक्षण)

कुशल दृष्टिकोन लाभलेले छायाचित्रकार म्हणून नव्याने आपली ओळख प्रस्थापित केेलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कवी दादू मांद्रेकर यांनी संपादित केलेल्या ‘प्रजासत्ताक’ वार्षिकाचा यंदाचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भारतीय संविधानाचे अर्थगर्भ दर्शन तळागाळात घडविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून ते हा उपक्रम सातत्याने राबवित आहेत.

‘प्रजासत्ताक’ने भाषा, प्रांताच्या मर्यादा ठेवलेल्या नाहीत. यात विविध भाषांतील, भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे यात प्रकाशित होणारे लेखन हे त्याचे प्रमाण आहे. अंकात ठिकठिकाणी आंबेडकरवाद व बुद्धविचारांचे प्रतिबिंब सापडते. डॉ. आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार असल्याने व त्यांनी बुद्धाकडून प्रेरणा घेतल्याने ते तसे अपरिहार्यही आहे. तरीही देशाची घटना हाच या विशेषांकाचा केंद्रबिंदू आहे. घटनाधारित स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व धर्मनिरपेक्षतेचा संस्कार देशात रुजविणे हा अंकाचा उद्देश दिसतो. भारतीय राज्य घटनेला या देशाचा पवित्र ग्रंथ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी तमाम देशवासीयांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी या अंकाने स्वीकारल्याचे  हिंदीतून लिहिलेल्या संपादकीयातून ध्वनित होते. देशाच्या विविध भागांतून लेखकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता भारतीय संघराच्याच्या संविधानातून मूळ स्वर घेऊन राष्ट्रबांधणीचे स्वप्नगीत गाऊ पाहणारे हे एक राष्ट्रीय नियतकालिक बनत चालले आहे, असे म्हणता येईल.

भारतीय घटनेच्या विविध अंगांचे दर्शन घडविणारे, संविधानाची पार्श्‍वभूमी सांगणारे, त्याच्या अक्षरांकित अर्थाच्या पुढे जाऊ इच्छिणारे असे मान्यवरांचे लेख, तसेच इतर संकलित लेखन असे या विशेषांकाचे स्वरूप आहे. बुद्ध शरण हंस (पटना) यांचा ‘अगर बाबासाहेब अम्बेडकर भारतीय संविधान के जनक नहीं होते...’, मनोहर रणपिसे (मुंबई) यांचा ‘संविधानातील मानवतावाद’, डॉ. डी. टी. गायकवाड यांचा ‘भारतीय संविधानाचा सरनामा-अवलोकन व आकलन’, प्रकाश कामत यांचा ‘ज्युडिशरी अ‍ॅण्ड मिडीया’ आदि लेखांचा अंकात समावेश आहे. याशिवाय बुद्ध विचारांचा उहापोह करणारा ‘बुद्ध अथवा कार्ल मार्क्स’ व दलित चळवळीतील ज्येष्ठ आणि कृतिशील कार्यकर्ते प्रा. अरुण कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा ‘प्रा. अरुण कांबळे सर : आंबेडकरी विचारांची अस्मिता’, असेे लेखही यात आहेत.

अंकाच्या शेवटी कवितांचा विभाग आहे. त्यात आंबेडकरांशी निगडीत अशा कविता दिसतात. अशाच एका ‘पुस्तक’ या कवितेत आनंद गायकवाड म्हणतात -

तुमच्या सार्‍या पुस्तकांना
पुरून उरतं एकच पुस्तक
जे कायद्याच्या अन्
माझ्या बापानं लिहिलं आहे…

दादू मांद्रेकर यांच्याही अनेक कविता या विभागात आहेत. त्यापैकी ‘महानायक’ ही एक हिंदी कविता आहे. आर्य संस्कृतीच्या मागे जाउन स्वत:चे अस्तित्व कवी याठिकाणी सांगतो -

मारे मानवतावादी सभ्यता पर आक्रमण करनेवाले
आर्योे को थमाने वाले हम ही तो थे
और बाद में उसके विषम संस्कृती के
स्तंभ उखाडकर फेकनेवाले
हम ही तो थे
उसके बाद बुद्ध के जन्म का जश्‍न मनानेवाले
बुद्धत्व को साथ देनेवाले हम

लेखणीच्या ताकदीवर जातिव्यवस्थेवरील समाजरचना उद्ध्वस्त करून टाकण्यास सज्ज झालेला मुखपृष्ठावरील एक ‘विद्रोही’ चेहरा आणि लगेच (पानाच्या) आतल्या बाजूने बुद्धाची शांत-स्थीर मुद्रा ही दोन्ही बळी खैरे (यवतमाळ) यांची रंगचित्रे लक्ष वेधून घेतात. त्यानंतर सुरुवातीच्या पृष्ठांवर हिंदी, इंग्रजी व मराठीतून घटनेचे प्रास्ताविक ‘प्रिएम्बल’ देण्यात आले आहे.

अंकाची छपाई, मुद्रण, मजकुराचे सादरीकरण पाहता अंकाची प्रगती गुणात्मकदृष्ट्या सकारात्मक होत आहे. अंकाचा व्याप एकहाती सांभाळूनही त्याची गुणवत्ता टिकवून त्यात वृद्धीसाठी झटणार्‍या संपादक दादू मांद्रेकर यांचे त्यासाठी अभिनंदन करायला हवे.

प्रजासत्ताक (2010)
संपादक : दादू मांद्रेकर
प्रकाशन : अनिला मांद्रेकर
***
प्रजासत्ताक वार्षिकाची मुखपृष्ठे 


अंक  1 ला  - 2006

अंक  2 रा  - 2007

अंक  3 रा  - 2008

अंक  4 था - 2010

अंक  5 वा  - 2011

अंक  6वा   - 2012

अंक  7 वा  - 2013

अंक  8 वा   - 2014


'पर्यावरण'च्या दोन अंकाचे मुखपृष्ठ . 'पर्यावरण'चे २०१२ व २०१३ असे दोनच अंक निघाले.