नारायण सुर्वे यांच्या 'शुभेच्छा'(कवी नारायण सुर्वे यांनी दादू मांद्रेकर यांच्या पहिल्या ‘शापित सूर्य’ कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून)

दादू मांद्रेकर हे कवीही आहेत व विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सहभागही आहे. कार्यकर्त्यांचे संवेदनक्षम मन आणि कविचा कलाव्यवहार असा दुहेरी गोफ त्यांच्या मानसिकतेत गुंफलेला आहे. भोवतालचा निसर्ग जितक्या सहजतेने ते न्याहाळतात तितक्याच आत्मियतेने ते गोमंतकीय लोकजीवनाचे साद-पडसादही चित्रीत करतात. गोमंतक प्रदेश हा केवळ निसर्गानेच बहरलेला प्रदेश नाही तर मुख्यत: इथे जगणार्‍या विविध थरांतील लोकजीवनाची स्पंदने, त्यांचे श्‍वास-उच्छवास, ताणतणाव व त्यांचा इतिहास ते आपल्या कवितेमधून व्यक्तवितात. हा काव्यसंग्रह जरी त्यांचा सामाजिक जाणीवेचा आणि प्रस्थापित गुलामगिरी झुगारण्याचा आरसा असला तरी त्यांच्या इतर कविताही अंतर्मुख करणार्‍या आहेत. अलिकडील बहुसंख्य मराठी कविताही केवळ लय, किंवा केवळ निसर्ग किंवा केवळ नाजूक उसासे सोडणारी नाही. ती समोरच्या उपस्थित वास्तवाचा वेध टिपू लागते. ते घनघोर वास्तव शब्दांकित करू पहाते. हा आजच्या बदलत्या काळाचा युगधर्मच आहे. याचा अर्थ नादमय कविता दुय्यम आहे असे नाही, तर ती लयबद्धता व तालतोल सांभाळीत स्वत:चा असा वेगळा अविष्कार करू मागते. ती वेगळा विचार मांडू पहाते. ती अधिक धिटाईने समाजमनाशी संपर्क साधू पहाते. विशेषत: ही कविता आत्यंतिक व्यक्तिगत समोरच्या जनमानसाशी काही बोलू मागते. मी आणि माझे समोरचे वास्तव याच्या ताणात ती सहानुभूतीने वावरू लागते व मला हे एक शुभचिन्ह घडते आहे असे वाटते.

दादू मांद्रेकरांची कविता ही एका अस्वस्थ मनाच्या आतील कल्लोळाचे दर्शन घडवते. समाजव्यवस्थेचे दु:ख चितारते व तोही एका विशिष्ट शैलीत कल्लोळाना शब्दांकितत करताना पाहिले की आनंद होतो.

...दादू केवळ दलित समाजातील आहेत म्हणूनच इतके तिखट आणि जहाल शब्दात बोलतात असेच मानावयाचे काही कारण नाही. ते समग्र दलितांविषयी आजच्या बदलांच्या सर्व धारणा मनात वागवून एकाच चौकटीत फिरत नाहीत. एक संस्कारक्षम दलित मन जीवनातल्या विसंगतीविषयी जेव्हा स्वत:च्या प्रतिक्रिया व्यक्तवू मागते तेव्हा त्याचा मनातील कल्लोळ आपण समजून घेतला पाहिजे असे मला वाटते.

...दादूच्या मानसिकतेतला सर्व कल्लोळ त्यांच्या इतर कवितातही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र विखुरलेला आहे. शब्दांकित झालेला आहे.

दादूच्या एकूण कवितेचा पिंड हा परिवर्तनवादी मनाचा व समोरचे भीषण वास्तव, खोटी कर्मकांडे आणि माणसातील उच्चनीचतेचा भाव बदलला पाहिजे असा आहे. तरीही दादूने काव्यरचनेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्याच्या काही रचना खूपच पसरट वाटतात तर काही ठिकाणी नेमके थांबायला पाहिजे तेथे त्यांचा अधिक विस्तार होताना आढळतो व मग रसभंग झाल्यासारखा होतो. काव्यलेखनातील सर्व धोके, मोह टाळता आले पाहिजेत. घाई करता कामा नये आणि विपुल लेखन हाच काही साहित्याचा मानदंड नाही. गुणात्मकतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु जो चिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो तो स्वत:ची वाट शोधतोच नव्हे तर ती त्याला सापडते. यापुढच्या दादूच्या अधिक सकस कवितांकडे मी लक्ष ठेवून आहे.

उसळलेल्या संवेदनाना दादूने मोकळीक करून दिलीच आहे ते उद्रेक अधिक वाढत राहतो.

शुभेच्छांसहित -
नारायण सुर्वे
20 जुलै 90