कवितेच्या ‘वेशीवरून’


(शापित सूर्य या दादू मान्द्रेकर यांच्या कवितासंग्रहातील मनोगतातून हा भाग घेतला आहे. आयु. मान्द्रेकर यांची कवितेविषयीची वाटचाल, दृष्टिकोन कळण्यास मदत होईल वाटले म्हणून)



मी कविता करण्यास (किंवा मला ती स्फुरण्यास )कधीपासून सुरवात केली (sic) याचे नक्की साल मला आता आठवत नाही. पण ती माझ्या वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षापासून असवी. कारण त्यावेळच्या माझ्या कविता आज माझ्याकडे नाहीत. साधारण साठ-सत्तर कवितांची वही मी माझ्याच हाताने नष्ट केली. मी वीस वर्षांचा असताना त्या कविताकडे मागे वळून ज्यावेळी पाहिले त्यावेळी त्यात माझ्या जगण्याचे प्रतिबिंब मला अजिबात जाणवले नाही.  माझं सत्व त्यात जाणवलं नाही.


याची कारणं असेक आहेत. त्यात उशिरा पडलेलं दलित साहित्याचं देणं हे जसं एक प्रमुख कारण आहे, तसेच खूप उशिरा कळलेला, मनस्वी जाणवलेला आणि माझ्या रोम रोम (sic) भिनलेला, भावलेला आंबेडकरवाद हेही त्याचे दुसरे एक प्रमुख कारण आहे.


बालकवीच्या कवितेनेे मला प्रारंभी जबरदस्त मोहिनी घातली. माझ्या काव्यप्रेरणेचे मूळ कदाचित ते असेेल नसेल, पण उत्स्फूर्तता मात्रतीच होती हे मी नक्की सांगेन. त्यानंतर दलित कवितेेची ओळख होईपर्यंत अनेक प्रस्थापित कवी पाठ्यपुस्तकातून भेटत गेले  आणि माझ्या मनावर पर्यायाने माझ्या कवितेवर आपला ठसा कळत नकळत उठवित गेले. याच्यात सम्यक विचारधारेचा जसा अंतर्भाव नव्हता तसा समग्र समाजपरिवर्तनाचाही विचार नव्हता. युगानूयुगाच्या मनावर प्रतिबिंबित झालेल्या माझ्या सांस्कृतिक गुलामीच्या त्या कविता म्हणजे एकप्रकारे साक्षीच होत्या !

एखाद्या कवीचा त्याच्या पूर्ण कवितांचा काव्यसंग्रह असतो हे सुद्धा ज्या वयात (अर्थात माझ्या बाबतीत मी 18-19 वर्षांचा असताना) मला माहित नव्हते, त्या वयात हे घडत गेले.  या काव्यसंग्रहाला ज्यांची प्रस्तावना लाभलेली आहे त्या  गुरुवर्य नारायण सुर्वे यांचीही एक ‘जगणे कठीण होत आहे’ नावाची कविता पाठ्यपुस्तकातून गेली होती. या कवितेकडेसुद्धा मी जबरदस्त आकर्षिला गेलो. सामाजिक जाणीव म्हणजे नेकके काय हे ज्यावेळी मला माहित नव्हते त्यावेळीही माझ्या सामाजिक जाणीवेचा कोपरा जागा होता आणि म्हणूनच मी त्या कवितेकडे आकर्षिला गेलो होतो याची कारणं आज उलगडत जातात.


माझं स्वत:चे (sic) एक दु:ख आहे. तडप आहे. वेदना आहे याची जाणीव मी अठरा - वीस वर्षांचा होईपर्यंत मला नव्हती. त्यामुळे माझ्या पहिल्या कवितामधून प्रसवला तो इतर कवींचा प्रभाव.  त्यातही बालकवीचा अधिक. अर्थात हेही मला जाणवले ते माझ्या विसाव्या वर्षानंतर. ज्यावेळी माझा स्वाभिमान, माझी मानवतेची प्रतिमा, समतेची संकल्पना, माझी अस्मिता तयार झाली होती त्यामुळे ! त्यामुळष ह्या माझ्यापूर्वीच्या कविता वाङ्मयीनदृष्ट्या नष्ट करणे योग्य नाही हे पटूनही त्या सातत्याने माझ्यासमोर ठेवणे मला प्रशस्त वाटले नाही. पर्यायाने मी त्या फाडून टाकल्या. त्या फाडून टाकल्या म्हणून त्याचे वैषम्य किंवा दु:ख तसे आजही मला वाटत नाही. उलट डोक्यावरचे ओझं (sic) कुठतरी कमीच झाल्यासारखं वाटतं !


माझ्या सामाजिक कवितेतील संदर्भ ज्यावेळी जागा झाला त्यावेळीही दलित कवितेबरोबरच ग्रेसने माझ्या मनात एक घर केले होते. याच कारण पुन्हा माझा निसर्गाच्या विभिन्न रूपाशी किंवा त्या प्रतिभेशी तादात्म्य पावणारा पिंड हे असू शकेल. ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’(sic) या त्यांच्या कवितासंग्रहाच्या मी अक्षरक्ष: (sic) काही काळ धुंदीत होतो; पण त्याही धुंदीतून मी जाणीवपूर्वक बाहेर पडलो आणि माझी स्वत:चीच पाऊलवाट तुडवित राहिलो. कोणत्याही कवीचा आज माझ्या कवितेवर प्रभाव नाही असाही माझा दावा नाही, पण त्यानंतर कोणत्याही कवीला मात्र मी माझ्या मनस्पंदनावर जाणीवपूर्वक ताबा मिळवू दिला नाही हेही सत्य आहे.


...माझी कविता ही स्सखलनशील (sic) आहे की नाही याची मला जाणीव नाही. ती ज्वलनशील  आहे की नाही याचीही मला कल्पना नाही; पण माझी कविता ही अस्सल माझ्या वेदनांची वीण आणि वीणा झालेली आहे. भारतीय विषम समाजव्यवस्थेची भीषण, दारुण आणि करुणही शोकांतिका कोरीत ती जखमेसारखीच वहात आहे हे सत्य होय.


कळायला लागल्यापासून तिचे मापदंड ठरवून मी तिला काही प्रसवले नाही; पण तेव्हापासून रौरावत उठलेली मनातील वादळे मी माझ्या कवितेपासून लपवूनही ठेवू शकलो नाही. त्यामुळे माझ्या उद्विग्न मनाचा, पोळलेल्या स्वप्नांचा, भोगलेल्या शल्यांचा आणि जगलेल्या जाणीवांचा पुन्हा प्रत्यय रसिकाना येण्याचा धोका नाकारता येत नाही. पेटलेला पलिता हातात असावा आणि त्याच्या काजळलेल्या, अंधारलेल्या उजेडात काट्याकुठ्यांची, दगड-धोंड्यांची, दरी-कपारीची पायवाट असली तर किंवा नसली तर ती करीत पुढे जावे असेच काहीसे माझ्याबाबतीत महाकारुणिक बुद्ध आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण प्रज्ञेचा पलिता माझ्या हातात पडल्यानंतर झाले. माझ्या कवितेचा गाभा तोच आहे. आवाजही तोच आहे. हे कोणी स्वीकारो, नाकारो. पण हे मला सांगण्यास निरतिशय आनंद होत आहे. म्हणून कविता माझ्याकडून घडायला लागल्यापासून मराठी कवितेच्या तेव्हाच्या (आणि आताच्याही) स्वरूप, रचनेविषयीचे स्थान किंवा त्याचे मर्मबंध, आकृतीबंध जे काय असतील ते मी अभ्यासण्याचे किंवा तपासण्याचे प्रयत्न केले नाहीत. प्रारंभीच्या काळात एक छंद म्हणून हा प्रयत्न झाला, पण तो त्या नष्ट केलेल्या कविताबरोबर नष्टही झाला असावा. त्यामुळे माझी कविता ही त्या प्रस्थापित आकृतीबंधापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची फिकीरही नाही.

***

आणखी थोडे.(‘ओंजळ लाव्हाची’ कवितासंग्रहाच्या ‘मनोगता’तून)

बाबासाहेब-बुद्ध-ज्योतिबा हे माझे आदर्श. त्यांचे विचार म्हणजे चंदन अग्नी. शापित सूर्या नंतर त्याच पद्धतीची कविता ह्या दुसर्‍या कविता संग्रहात वाचकांना वाचायला मिळेल. बाबासाहेबांचे एक रूप म्हणजे ज्वालामुखीचेच रूप. सतत जाळणे आणि त्यातून नवे सृजन जन्माला घालणे हा आंबेडकरी विचारांचा गाभा. त्या गाभ्याचे अंतरंग म्हणजे हा कविता संग्रह. ही कविताही पचवणे वाचकांना जड जाईल.
पंचवीस वर्षांत दोनशे पंचवीस तरी कविता स्फूरायला हव्या होत्या, पण तसे माझ्या बाबतीत होत नाही. एखादी कविता स्फूरली तरी ती क्वचितच एका बैठकीत पूर्ण होते. अन्यथा कित्येक वेळा कविता पूर्ण व्हायला महिनोन महिने लागतात.
माझ्या बाबतीत फुला-मुलांची कविता मला सहजस्फूर्त असते, पण सामाजिक परिवर्तनासाठी त्या कवितेचा काही उपयोग होत नसतो याची मला अगदी मी 18-20 वर्षांचा असताना एकदा मला जाणीव झाली आणि ती कविता मला सहजस्फूर्त असूनही मी त्याच्यामागे मागे धावलो नाही. एक निर्भेळ आनंदासाठी तशी कविता ठीक आहे. सामाजिक परिवर्तनासाठी कविता उपयुक्त नाही !
परिवर्तनवादी कविता मी वर म्हटल्याप्रमाणे एक प्रकारचा वैचारिक अग्नी, प्रलयच असतो आणि विशेष म्हणजे तो आंबेडकरवादी कवितेतून अगदी प्रत्ययास येतो !
माझी कविता ही अशीच आहे. ‘शापित सूर्य’ झाल्यानंतर हा दुसरा काव्यसंग्रह.
या काव्यसंग्रहाचे नामाभिमान (sic) काय असावे या विचारात असतानाच ही एक काव्य पुष्पांजलीच आहे याची मला एकाएकी जाणीव झाली, पण ओंजळीत फुलाऐवजी अंगार भरलेले आहेत आणि ती ओंजळ आपण कोणत्या तरी नव्या निर्माणासाठी कोणाला तरी अर्पण करत आहोत असे चित्र समोर आले. त्याचवेळी लाव्हा ओकणारा पर्वतही समोर आला आणि या काव्यसंग्रहाला एक समर्पक नाव मिळाले ‘’ओंजळ लाव्हाची...!’
नित्याच्या घडामोडीवर परखड भाष्य करणार्‍या चार-सहा ओळींच्या कवितांची दैनंदिन प्रहसनात्मक सदरे मी अनेक वर्षे लिहित आलो. ती कोण लिहितो हे सामान्य वाचकांना अजूनही माहित नाही. हे एक वैचारिक प्रहसनच असते ! त्यामुळे अशी कविता मला स्फुरणे हा माझ्या (sic) स्थायीभाव आहे, पण या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेल्या कविता स्फूरतानाचा आशय हा मनात कित्येक दिवस धुमसत असायचा !
माझे मन अतिशय जागृत असते. ते अतिशय तरल आणि संवेदनशील असते. त्यामुळे कुठल्याही अवतीभवती घडलेल्या घटनांचे साद-पडसाद लगेच माझ्या मनावर उमटतात. अन्याय आणि बदमाशगिरी यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात.
... माझे शब्द हेच माझे हत्यार. मी शब्दानी तलवारीसारखे सपासप वार करतो. माणसाच्या, राष्ट्राच्या भवितव्यासाठी जे शब्द वज्रासारखे माझ्यासमोर फेर धरून नाचतात, तसेच आजही मृदू मुलायम शब्द एखादी निसर्गाची कविता स्फूरताना माझ्यासमोर फेर धरून नाचतात.
...पण अश्या कवितानी एक निखळ आनंद मिळतो तेवढाच ! बाकी सामाजिक परिवर्तनाचा एकही अणू एइकडून (sic) तिकडे हालत नाही. त्यामुळे मी निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेलो असूनही मी अश्या कवितांच्या आहारी गेलो नाही.
आज जे लाव्हाचे रूप आहे तेच एकवेळ पूर्ण पृथ्वीचे रूप होते. कालांतराने पृथ्वी थंड पडत गेली आणि तिने पृथ्वीवर आज जे आपल्याला दिसते ते सृजन घडवले. ! माझ्या आग ओकणार्‍या कवितेकडूनही मी हीच अपेक्षा ठेऊन आहे.
भारतातल्या सामान्य माणसाचे देवा-धर्मावर चालणारे शोषण थांबले पाहिजे आणि जाती-धर्म, कर्मकांड आनी (sic) ईश्‍वर, देव या सार्‍या नरकातून सामान्यातला सामान्य माणूस बाहेर आला पाहिजे हिच माझी अंतिम इच्छा आहे !
माझी कविता त्यादृष्टीने कारण ठरली तर मला निरतिशय आनंद होईल!