‘बहिष्कृत गोमंतक’विषयी

(समीक्षक डॉ. बाळकृष्णजी कानोळकर यांच्या ‘गोमंतकीय साहित्यातील शोधस्थळे’ पुस्तकातील ‘गोव्यातील दलितांविषयीचा सामाजिक दस्तऐवज : ‘बहिष्कृत गोमंतक’ या प्रकरणातून निवडक भाग)

...सामाजिक पातळीवर ‘आम्ही कोण?’ या स्वरूपात इथल्या शिशित दलित तरुणाला पडला. त्याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करू लागला, संघटितपणे करू लागला. या अशा प्रयत्नांचे फलित म्हणजेच आयुष्यमान दादू मांद्रेकर आणि ‘बहिष्कृत गोमंतक’ हा त्यांचा ग्रंथ.

आयु. दादू मांयाद्रेकर हे इथल्या मराठी साहित्यविश्‍वाला तसे परिचयाचे आहेत. ते एक कवी, विचारवंत म्हणून ज्ञात आहेत. या सर्वांपेक्षा ते एक चळवळ्या आहेत, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ते चळवळ्या आहेत आणि म्हणूनच इथे या प्रदेशात दलितांच्या प्रश्‍नांसंबंधाने ज्या ज्या काही चळवळी आजवर उभारल्या गेल्या त्या सर्वांमध्ये त्यांचा सहभाग आहेच. अशा चळवळीतून आलेले अनुभव, त्याचे खूप मोठे भांडारच त्यांच्यापाशी आहे. त्यातील काही अनुभवांना दिलेले शब्दरूप म्हणजेच हा ‘बहिष्कृत गोमंतक’. यापूर्वी त्यांचा ‘शापित सूर्य’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोमंतकातील दलित मराठी कवितेचे खर्‍या अर्थाने प्रतिनिधीत्व करणारा असा हा त्यांचा कवितासंग्रह आहे. तर ‘बहिष्कृत गोमंतक’ची पांढरी गावकूर ही अशी आहे.

... या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणातून लेखकाने, जशी आपली ‘घुस्मट’ मांडलेली आहे त्याचप्रमाणे त्या विषयीची प्रचंड चीड, विद्रोहाचा एक अंत:प्रवाह या अत्यंत ललितरम्य भाषेच्या कुसुमकुंजात लपलेल्या  जहाल सर्पदंशाचा वा खदखदणार्‍या  अंतस्थ लाव्हारसाचा दाहक प्रत्यय कुणाही सजग वाचकाला आल्याशिवाय राहणार नाही.

... या कथन निवेदनातून व्यक्त झालेले हे वास्तव केवळ दलित समाजाच्या वाट्याला आलेलेच वास्तव नसून ते इथल्या काबाडकष्ट करून हाताच्या पोटावर जगणार्‍या इतरही समाजाचे कमी-अधिक प्रमाणात वास्तव आहे. त्यामुळे हे ‘कथन’ सार्वत्रिक दु:ख वेदनेचे रूप घेऊन वाचकांच्या समोर येत राहते. तरीही यातील प्रत्ययास येणारे जीवन हे प्रामुख्याने गोव्यातील खेडेगावांमधून वस्ती करून राहणार्‍या महार समाजाचे आहे. पुन: हा समाजही सजग, जागृत होऊ लागल्याच्या खुणा या कथनातून जागोजागी मिळतात. तसेच हा समाज एका परिवर्तनाच्या सरहद्दीवरचा ढीरपीळशपीं झशीळेव मधला आहे, याचे संदर्भ या कथनातून जागोजागी स्वत:चा परिचय करून वाचकाला देत राहतात. तसेच या समाजाचा परिचय आधुनिक शिक्षण, जीवनपद्धती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार, त्याचप्रमाणे नवबौद्धांचा ‘धम्म’ इत्यादी नव्याच, त्यांना आजवरच्या अज्ञात, नव्या असलेल्या ‘वस्तू’शी झालेला आहे, हे कळून येते.

...दादू मांद्रेकरांनी इथल्या दलित समाजाच्या एकूणच चित्रण करणारा, खरे तर त्याचे अस्सल रूप दाखविणारा असा हा ‘आरसा’ आपल्या या ग्रंथाच्या रूपाने तुम्हा-आम्हा समोर धरलेला आहे. त्यापासून जो काय बोध घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा.