दादू मान्द्रेकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी अल्प आजारानंतर दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता गोव्यातील टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या गोवाआवृत्तीत तसेच अन्य बहुतेक गोमंतकीय वृत्तपत्रांतून आलेली दिसते. यांत दै.लोकमत, दै. तरूण भारत, दै.गोमन्तक. दै.गोवनवार्ता, दै.दैनिक हेराल्ड, दै.भांगरभूंय यांचा समावेश होता. दै. नवप्रभा या वृत्तपत्राने दि 27 नोव्हेंबर 2020 रोजी एक संपूर्ण पान दादू मान्द्रेकर यांच्याकरिता वापरले आहे.
गोव्यातील एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीत दि. 27 नोव्हेंबर 2020च्या अंकातील बातमीत म्हटले आहे की ‘सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार दादू मांद्रेकर (63) यांचे गुरूवारी संविधान दिनीच (बातमीतील संविधान दिनास अनुसरून उल्लेख दादू मान्द्रेकर यांच्या भारतीय संविधानातील मू÷ल्यांबद्दल त्यांच्या आग्रही मतांमुळे व त्यांच्या ‘प्रजासत्ताक’च्या संपादनामुळे असावा)निधन झाले. मांद्रेकर यांना कोविडची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. तथापि, पुन्हा आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. ते मांद्रे येथे राहायचे. कालच त्यांच्या पार्थिवावर स्थानिक दफनभूमित बुद्धपरंपरा पाळून करण्यात आले.’(sic)
या बातमीच्या मथळ्यात ‘आंबेडकरवादी चळवळीचा शिलेदार हरपला’ असे म्हटले आहे.,
गोव्यातील अन्य एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीच्या 27 नोव्हेंबर 2020च्या अंकात म्हटले आहे की - ‘गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे अग्रणी दलितनेते दादू मांद्रेकर यांचे 26 रोजी म्हणजेच भारताच्या संविधान स्थापना दिनीच निधन झाले. ते आजीवन भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. संविधानातील समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष आदी मुल्यांची (sic) समाजात रूजवण व्हावी यासाठी अखेरपर्यंंत ते कार्यरत राहिले. आजारातून तेे बरे झाले होते, मात्र प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर त्यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. बुधवारी मांद्रे येथे स्थानिक दफनभूमीत बौद्ध धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट कवी, छायाचित्रकार आणि स्पष्टवक्ते म्हणून परिचित होते. ’
त्यांच्या निधनाबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातील, स्तरातील, धर्मांतील लोकांकडून दु:ख व्यक्त केल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यावरून दिसून येते. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनीही त्यांच्या निधनानंतर शोकसंदेश जारी केलेले दिसतात.
दरम्यान, तिबेतच्या भारतस्थित निर्वासित सरकारचे सभापती Pema Jungney यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यत केलेले दिसते. “I am saddened to learn the demise of Shri Dadu Mandrekar who was a staunch and ardent supporter of our cause. On behalf of the 16th Tibetan Parliament in Exile, I would like to pay my sincere condolences to you and your family.” ही बातमी येथे क्लिक करून पाहता येईल.
दरम्यान, लोकमतने दादू मान्द्रेकर यांच्या निधनाच्या दुसर्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी गोवा आवृत्तीच्या अंकात अग्रलेख लिहिलेला दिसतो. ‘एक झंझावात निमाला’ या शीर्षकाच्या या अग्रलेखात दादू यांच्या व्यक्तीमत्त्वाचे चित्रण करण्यात आल्याचे दिसते. अग्रलेखातील काही नोंदी अशा -
‘दादू मांद्रेकर यांच्या निधनाने गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात निर्माण झालेले न्यूनत्व बराच काळ राज्यातील संवेदनशील मनांना सलत राहील. आपल्या पटलेल्या कारणासाठी जिवाचे रान करणारा तो हाडाचा कार्यकर्ता होता’
‘आंबेडकरांच्या प्रतिपादनाची चिकित्सा दादूने आपल्या विवेकाच्या सहाणीवर घासून केली. दलित उत्थानाची घाऊक कंत्राटे घेतलेल्या राजकारणपटूंच्या भोंदू अवसानाचे मर्मही त्याने समजून घेतले आणि मगच आंबेडकरी विचार श्रेष्ठ मानून त्याने या विचारांच्या प्रसारास वाहून घेतले. त्याच्या वैचारिक धारणांना प्रचंड वाचनाचे अधिष्ठान होते.’
दादू मान्द्रेकर आपल्या निवासस्थानी. (फोटो: विकिमिडीया) |